

Indian Army's T-55 tank arrives in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे भारतीय लष्कराचा टी-५५ रणगाडा शहरात दाखल झाला आहे. हा रणगाडा गारखेडा परिसरातील कारगील स्मृती उद्यानात बसविण्यात आला असून कारगील दिनी म्हणजे येत्या २६ जुलै रोजी त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
गारखेडा परिसरात नाथप्रांगण भागात सात एकर जागा उद्यानासाठी आरक्षित होती. तिथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून कारगिल स्मृती उद्यान विकसित करण्यात येत आहे. सध्या उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृती जपणे हा या मागील हेतू आहे. या उद्यानात सैनिकी पद्धतीचे खेळ शिकवण्यासाठी रचना करण्यात येत आहे.
देशातील जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उद्यानाला भव्य स्वरूप देण्यात येत आहे. या उद्यानात लष्कराचा वापरात नसलेला एक रणगाडा ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा सैनिक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मागील काही दिवसांपासून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आता यश आले आहे. संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर आता लष्कराचा एक टी ५५ रणगाडा पुणे येथील छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आला आहे. हा रणगाडा कारगील स्मृती उद्यानात बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. २६ जुलै कारगील दिनी त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
66 मराठवाडा ही पुरातन काळापासूनच योद्ध्यांची भूमी राहिलेली आहे. स्वतंत्र भारताचा लढा असो अथवा मराठवाडा मुक्तिसंग्राम या दोन्ही लढ्यांत येथील अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या मुख्यालयात शहरात कारगील स्मृती उद्यानात एक रणगाडा असावा यासाठी प्रयत्न सुरू होते. हा रणगाडा मिळाल्याने उद्यानाच्या वैभवात भर पडणार आहे. - दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी.