

India Aghadi's protest against the SIR process
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत इंडिया आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी जी. सी. गौडा यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
इंडिया आघाडीच्या वतीने एसआयआर प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, उबाठाचे बाळासाहेब थोरात, पांडुरंग तांगडे पाटील, ख्वाजा शारफुद्दिन मुल्ला आणि कॉम्रेड अॅड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. मतदार याद्या या मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार आहेत.
एसआयआर प्रक्रियेत नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार याद्यांचे संगणकीकरण आणि माहितीचे केंद्रीकरण याबाबत आघाडीने आक्षेप नोंदविले आहेत. पात्र मतदाराचे नाव चुकीच्या प्रक्रियेमुळे वगळले जाऊ नये, तसेच अपात्र किंवा दुबार नोंदी वगळताना संबंधित मतदाराला योग्य संधी व पारदर्शक पडताळणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार याद्यांशी संबंधित घडामोडी तसेच महाराष्ट्रातील २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येतील बदलांचा संदर्भ देत मतदार यादीतील बदलांची सखोल आणि निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. एसआयआर प्रक्रियेतील निर्णय, मतदारांच्या नोंदींमध्ये होणारे बदल आणि निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीतील केंद्रीकरणाबाबत स्पष्टता देण्याची मागणीही करण्यात आली.
मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी मतदार यादीची अचूकता, पारदर्शक पडताळणी आणि हरकर्तीचे योग्य निराकरण आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.