

Incidents of drowning in the Godavari River at Paithan have increased
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील गोदावरी नदी व जायकवाडी जलाशय परिसरात बुडून मृत्यू होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या तीन आठवड्यांत अशा काही दुर्घटना घडल्या आहेत. या सततच्या घटनांमुळे प्रशासनही हतबल झाले आहे. दरम्यान, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह पोलिसांत नोंद न करता परस्पर नेण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या पुरुषोत्तम मास (धोंड्याचा महिना) सुरू असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक गोदावरी स्नानासाठी पैठण येथे येत आहेत. अशा परिस्थितीत नदी व धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यापूर्वीही गंगापूर येथील एका तरुणाचा गोदावरीत बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी नातेवाईक मृतदेह परस्पर घेऊन जात असताना पोलिसांनी काही अंतरावरून त्यांना परत बोलावून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली होती.
दरम्यान, आतापर्यंत पाण्यात बुडवून मृत्यू होण्याच्या पाच घटना घडल्या असल्या तरीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता नातेवाईक मृतदेह परस्पर घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे अशा घटनांच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोदावरी नदीत वाढत्या बुडण्याच्या घटनांमुळे घाट परिसरात अधिक सुरक्षा उपाययोजना, इशारा फलक, तसेच बचाव पथकांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्नान करत असताना तरुणाचा बुडून मृत्यू
पैठण येथील गोदावरी नदीत स्नानासाठी शुक्रवारी (दि. १२) दुपारी अमोल मोहन सावंत (वय २५, रा. नायगाव खांडेवाडी, ता. पैठण) हा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत आला होता. नाथसागर धरणासमोरील गोदावरी नदीतील गजगड बाबा घाटाजवळ स्नान करत असताना तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पैठण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, सोबत असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत कोणतीही नोंद न करण्याची भूमिका घेतल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात न नेता परस्पर नेल्याची माहिती समोर आली आहे.