

In twelve months, 1,129 farmers ended their lives.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मराठवाड्यात अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम आहे. गेल्या १२ महिन्यांत विभागातील तब्बल ११२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात दिवसाला सरासरी ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
मराठवाड्यातील बहुतांश भाग हा कमी पर्जन्यमानाच्या क्षेत्रात मोडला गेला. त्यामुळे कर्जबाजारीपणा, दुष्काळामुळे होणारे नुकसान तर कधी अतिवृष्टी या कारणामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. शिवाय शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
या सर्व गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवत आहेत. मागील वर्षभरात म्हणजे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान मराठवाड्यातील ११२९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
यात जानेवारी महिन्यात विभागात ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात ७५, मार्च महिन्यात ११०, एप्रिल ८९, मे महिन्यात ७७, जून महिन्यात ८७, जुलै महिन्यात १०८, ऑगस्ट ७८, सप्टेंबर ८३, ऑक्टोबर १११, नोव्हेंबर ११०, तर डिसेंबर महिन्यात ११३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक २५६ आमहत्या या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या खालोखाल २२४ आत्महत्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत.
उपाययोजनांची गरज
गेल्या वर्षभरात मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या बारा महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०२५ सालात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत १८१ ची वाढ झाली आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही शेतकरी आत्महत्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील वर्षभरात लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुका झाल्या. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.