

In the municipal elections, the Shiv Sena lost its traditional voters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे सेना व शिंदे सेना असे दोन्ही गट मिळून शिवसेनेला केवळ १९ जागा राखण्यात यश आले.
उध्दव ठाकरे यांनी काँग्रेससोबत केलेली हात मिळवणी त्यामुळे पक्षात पडलेली उभी फूट हे शहरवासीयांना पटलेले नसून संघटन कौशल्याचा अभाव यासह अंतर्गत मतभेदाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलल्याने भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक ५७नगरसेवक निवडून आणत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले.
मी दगड जरी उभे केले तर तेही या शहरातील नागरिक निवडून देतील असा अभिमान बाळगत शहरावर विशेष प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची पूर्णतः वाताहत झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र दोन गटांत पक्ष विभागला गेल्यानंतर शहरातील पारंपरिक शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. एकीकडे शिंदे गट आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, या फुटीचा थेट परिणाम मतदानावर झाला. त्यातच उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी अनेक जुन्या शिवसैनिकांना न पटणारी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना काँग्रेसच्या सोबतीने दिसल्याने पारंपरिक मतदारांना न पटल्याने ते शिवसेनेपासून दुरावल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही शिव-सेना गटात संघटन कौशल्याचा अभाव समन्वयाचा अभाव असल्याने अपयश पदरी आल्याची भावना जुन्या शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. भाजप शहरातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून पुढे आली असून शिवसेनाआता पूर्वीसारखी राहिली नसल्याची खंत शिवसैनिकांमधून व्यक्त करण्यात आली आहे.