

In the Ganori group, BJP's development agenda is at the forefront
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील रेलगाव, पिंपळगाव वळण, वाहेगाव, आडगाव बुद्रुक, वाणेगाव तसेच अंतर्गत येणाऱ्या सर्व वस्त्यांमध्ये आज शनिवार, दिनांक ३१ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार रॅली व कॉर्नर बैठका आयोजित करण्यात आल्या. यावेळी मतदारांशी थेट संवाद साधत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजपा गणोरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निखिल चव्हाण आणि वाणेगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता विकास बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार मोहीम राबविण्यात आली. प्रचारादरम्यान आदर्श गाव किनगावः ते आदर्श गट गणोरी या संकल्पनेवर आधारित गेल्या काळात राबविण्यात आलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली.
यावेळी रेलगाव ते वाणेगाव रस्त्याचे सिमेंटीकरण, वाणेगाव ते शिरोडी बुद्रुक रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, पाळा वस्ती रस्त्यावरील पुलाचे काम, अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण, शेतवस्ती रस्त्यांचा विकास आदी कामांचा उल्लेख करण्यात आला.
तसेच पाणीपुरवठा योजनांचे सक्षमीकरण, सार्वजनिक पाणी टाक्यांची दुरुस्ती, डीपी ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ करून शेतकऱ्यांची वीज समस्या दूर केल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक प्रश्नांची जाण, प्रशासनाचा अनुभव आणि विकासाची स्पष्ट दिशा घेऊन आम्ही आमदार अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून काम करत आहोत. किनगावप्रमाणे संपूर्ण गणोरी गट आदर्श करण्याचा आमचा निर्धार असल्याचे उमेदवार निखिल चव्हाण म्हणाले. तर सुजाता बनकर यांनी पं. स माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचे आश्वासन दिले.