

In Sambhaji Nagar, the alliance exists only in name
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक शिव-सेना-भाजप युतीत लढवून जिल्हा परिषदेवर युतीचाच झेंडा फडकवणार, असा दावा युतीच्या नेत्यांनी मंगळवारी (दि. २०) केला होता. मात्र बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच युतीतील विसंवाद उघडपणे समोर आला. गंगार, पैठण, कन्नड, फुलंब्रीसह संभाजीनगर तालुक्यांत शिवसेना व भाजपने एकमेकांविरोधात थेट एबी फॉर्म दिल्याने युती प्रत्यक्षात नावापुरतीच उरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बुधवारी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातल्याने युती झाली असून त्यांच्या आदेशानुसार समन्वयाने निर्णय घेण्यात आल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या विश्वासाने केला होता. मात्र प्रत्यक्षात बुधवारी वेगळेच चित्र पहायला मिळाले. सकाळी दोन्ही पक्षांकडून युतीच्या उमेदवारांची संयुक्त यादी जाहीर करण्यात आली, मात्र दुपारनंतर भाजप व शिवसेना यांनी एकमेकांविरोधात एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली.
या प्रकारावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून शिवसेनेवर आधी एबी फॉर्म दिल्याचा आरोप केला जात असून, शिवसेनाही भाजपनेच प्रथम एबी फॉर्म दिल्याचे सांगत आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत बिघडलेले युतीचे सूर जिल्हा परिषद निवडणुकीत जुळतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता हे सूर कायम राहतात की पुन्हा बिघडतात, याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिल्लोड आणि सोयगावमध्ये आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अगोदर स्पष्ट केले होते. त्यांच्या याच भूमिकेनंतर आता जिल्ह्यातील अनेक आमदार एकला चलो रे चा नारा देताना दिसत असल्याने युतीच्या भवितव्याबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे.