छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे टेंशन वाढले

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे टेंशन वाढले

[author title="सुनील कच्छवे" image="http://"][/author]

छत्रपती संभाजीनगर : तीन दशकांपासून बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसला आहे. महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला लोकसभा मतदारसंघातील सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात लीड मिळविता आलेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न राहिला तर या ठिकाणी ठाकरे गटाला एकही जागा राखणे कठीण होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटातील विधानसभा इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत.

छत्रपती संभाजीनगर हा १९९० सालापासून शिवसेनचाच बालेकिल्ला राहिला आहे. महापालिका, जिल्हा परिषद यासोबतच आमदारकी, खासदारकी सर्वत्र शिवसेनेचेच वचर्स्व राहिले. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून निसटता पराभव झाला. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे आमदार निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतरच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी एमआयएम विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना झाला. यात शिंदेंच्या शिवसेनेने हा बालेकिल्ला खेचून आणला. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली होती. भुमरे यांनी सुमारे सव्वा लाख मतांनी एमआयएमच्या जलील यांचा पराभव केला. तर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ असूनही ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. सर्व विधानसभा मतदारसंघांत ठाकरे सेनेचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर राहिला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या सहाही विधानसभांमध्ये कसे लढायचे याचे टेन्शन इच्छूकांना आत्ताच आल्याचे दिसून येत आहे.

विधानसभानिहाय ठाकरे सेनेला मिळालेली मते

कन्नड – ४२ हजार ८३०

मध्य – ४३ हजार ४८०

पश्चिम – ५८ हजार ३८२

पूर्व – ३८ हजार ३५०

गंगापूर – ५३ हजार ११३

वैजापूर – ५६ हजार २०७

एकूण – ४ लाख ७६ हजार १३०

विधानसभानिहाय शिंदे सेनेला मिळालेली मते

कन्नड – ६८ हजार २३०

मध्य – ५९ हजार ७४०

पश्चिम – ९५ हजार ५८६

पूर्व – ६३ हजार २२८

गंगापूर – ९४ हजार ४१९

वैजापूर – ९३ हजार २३१

एकूण – २ लाख ९३ हजार ४५०

दानवेंचे विरोधी पक्ष नेतेपद निष्प्रभ ?

सध्या राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता हे एकमेव संविधानिक पद आहे. या पदावर छत्रपती संभाजीनगरचेच अंबादास दानवे विराजमान आहेत. पक्षाने खैरेंच्या प्रचाराची धुरा दानवे यांच्यावरच सोपविलेली होती. राज्यात इतरत्र ठाकरेंच्या शिवसेनेला काही प्रमाणात यश मिळाले. परंतु विरोधी पक्ष नेतेपद भूषविणाऱ्या दानवेंच्या छत्रपती संभाजीनगरात मात्र ठाकरे सेनेची मोठी पिछेहाट झाली. त्यामुळे दानवेंचे पद निष्प्रभ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news