

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. काळे झेंडे दाखवत नागरिकांनी जलील यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.
तत्पुर्वी अकोला जिल्ह्यातील अकोटमधील भाजप आणि एमआयएम युतीवर जलील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "विकास मंच अशी आघाडी झाली होती. विकास व्हावा म्हणून त्या ठिकाणचे पदाधिकारी भाजपसोबत गेले असावे. मात्र, त्यांना त्या आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत," असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
विकास हा आमच्यासाठी दुसरा मुद्दा आहे, पण जाती-जातीत भांडण लावणाऱ्या आणि तेढ निर्माण करणाऱ्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही, असे जलील यांनी म्हटले आहे. आमचे त्या ठिकाणचे उमेदवार कुठेही पक्ष सोडून गेलेले नाहीत. जाण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, एवढीच त्यांची चुकी आहे. शिवसेना, बच्चू कडू आणि इतर पक्ष देखील त्या ठिकाणी सोबत गेलेले आहेत. मात्र, आम्ही भाजपसोबत कुठेही युती करणार नाही, विकास नाही झाला तरी चालेल, असे ते म्हणाले.
राजकारण आहे राजकारणात विरोध होतोच, आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी इथे आलो आहे. मी विरोध करणाऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. काळे झेंडे आणि हिरवे झेंडे काय असतात हे १६ तारखेला स्पष्ट होईल, असेही जलील म्हणाले.