

Illegal sand theft from Sukhna riverbed
पैठण/आडूळ, पुढारी वृत्तसेवाः पैठण तालुक्यातील घारेगाव येथील सुखना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू तस्करी करीत असताना पाचोड पोलिस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दि.२३ रोजी छापा मारून ३० लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे वाळू तस्करामध्ये खळबळ उडाली आहे.
घारेगाव परिसरातील सुखना नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्करांनी धुमाकूळ घालून लाखो रुपयांची वाळू अवैधरीत्या तस्करी करण्यात येत असल्याची खबर पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांना मिळाल्याने शनिवारी रोजी सकाळी सकाळी ११ वाजता पोलिस पथकासोबत जाऊन अवैधरीत्या वाळू उत्खनन करीत असलेल्या नदीपात्रात छापा मारला यावेळी नदीत वाळू उपसा करून त्याची विनापरवाना वाहतूक करताना पाच ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळून रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी या संदर्भात आरोपी लक्ष्मण विष्णू वीर (२५), विष्णू भीमराव लहाने (५८), भरत काकासाहेब लहाने (३५), सतीश गणेश लहाने (३४) चौघे रा. घारेगाव व प्रल्हाद तेजराव वाघ (२५) रा. दरकवाडी या पाच जणांना ताब्यात घेऊन या पोलिस पथकाने सुखना नदीतून पाच विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉलीतील वाळू असा एकूण ३० लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पाच आरोपींविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने तालुक्यातील गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी तहसील कार्यालयांतर्गत पथक स्थापन करण्याचे आदेश आहेत. मात्र, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हे पथक कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.