

वाळूज महानगर : करोडी येथील आरटीओ कार्यालयासमोरील गायरान जमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरूम चोरी सुरू आहे. करोडी येथील गट क्रमांक १३५ व २४ हा शासकीय गायरान असून, रात्रीच्या वेळी या ठिकाणावरून जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून बेसुमारपणे हायवा, टेम्पो तसेच ट्रॅकटरमधून अवैधरीत्या मुरुमाची चोरटी वाहतूक केली जात आहे.
परिणामी गायरान जमिनीवर मोठमोठी खड्डे पडली असल्याने जनावरांना चारण्यासाठी गायरान जमीनच शिल्लक उरली नाही. त्यामुळे जनावरे कुठे चारण्यासाठी न्यावी, असा प्रश्न करोडी येथील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. वाळूज औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम तसेच रस्त्याची कामे सुरू आहेत. शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सध्या मुरुमाची मोठी मागणी आहे.
या विषयी मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरील गट क्रमांक २४ मधील ५ ते ६ एकर गायरान जमीन ईएसआयसी हॉस्पिटलला हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणावरून रात्रीबेरात्री उत्खनन करून मुरूम चोरी सुरू असून, आम्ही तीन दिवसांपूर्वी याचा पंचनामाही केला आहे. ईएसआयसीने तात्काळ या जागेवर कंपाउंड करणे गरजेचे आहे.
महसूल प्रशासनाचा पंचनामा; कारवाईची प्रतीक्षा
करोडी येथील गायरान जमिनीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाची महसूल विभागाने तीन दिवसांपूर्वी पंचनामा करून नोंद घेतली आहे. गट क्रमांक २४ मधील सुमारे ५ ते ६ एकर जमीन ईएसआयसी रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आल्याचे मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के यांनी सांगितले. मात्र, जागेला संरक्षणभिंत किंवा कंपाउंड नसल्याने रात्रीच्या वेळी सर्रास मुरूम चोरी होत आहे. त्यामुळे ईएसआयसी प्रशासनाने तातडीने जागेला कंपाउंड करावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.