

Kunbi records Hyderabad Gazette
छत्रपती संभाजीनगर : हैद्राबाद गॅझेटच्या २ सप्टेंबरच्या जीआरनुसार मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर प्रक्रिया वेगात सुरू आहे. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे ईडब्ल्यूएसमधील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या मागणीवरही लवकरच बैठक घेऊन निर्णय करण्यात येणार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (दि. ८) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मंत्री विखे पुढे म्हणाले, आरक्षणासाठी गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या त्रीसदस्य समित्यांचा सातत्याने आढावा घेतला आहे. विशेषत: या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की? अण्णासाहेब जावळे यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ सुरू करण्याची गरज आहे. ते महामंडळ सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मराठा संघटनाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सरकारवर तीव्र टीका करत, सरकार आरक्षण दिल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात जात प्रमाणपत्रांना वैधता का दिली जात नाही? असा सवाल उपस्थित केला.
समाजाला वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा देत १८ एप्रिलपासून आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यावर विखे पाटील यांनी या संदर्भात येत्या २३ तारखेला सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान बारामती निवडणुकीत काँग्रेसने अद्याप माघार घेतलेली नसल्याचे सांगत ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन करत पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले, बाळराजे आवारे पाटील पुतळे विक्री प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही; मात्र हे प्रकरण गंभीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोणी फसवणूक करत असेल, तर तो गुन्हा असून पोलिसांनी केलेल्या कारवाईबरोबरच अधिक कडक कारवाई झाली पाहिजे.