

छत्रपती संभाजीनगर : धनंजय लांबे
विरोधकांवर भारी पडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून त्यांना चारीमुंड्या चित करण्याचे ‘कर्तृत्व’ गाजविणार्या नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचा खून केला. अशाच दहशतीच्या राजकारणातून नेत्यांच्या वाल्मीक कराडसारख्या राजकीय हस्तकांनी कोट्यवधींची माया कशी जमविली, हे आता उघडकीस येत आहे. एखाद्या राजकीय नेत्याचा गुन्हेगाराला वरदहस्त लाभण्याची ही पहिली घटना नाही, पण नेता आणि गुन्हेगार यांच्यातील रेषा इतकी धूसर झालेली महाराष्ट्राने कधी पाहिली नाही.
धनंजय मुंडे यांनी जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने वाल्मीक कराड आणि कंपनीची साथ घेतली, तशी त्यांच्या विरोधकांना घेता आली नाही. प्रश्न नीती-अनीतीचा होता काय, याचे उत्तर तेच देऊ शकतील, पण वर्चस्ववादाचा निश्चितच होता. जिल्हा, तालुका आणि मतदारसंघात चाललेल्या मनमानीला चाप लावण्याचे धाडस जिवाच्या भीतीने कोणीच करू शकत नव्हते, पण संतोष देशमुख यांनी केवळ जाब विचारला म्हणून त्यांचा हाल-हाल करून खून करण्यात आला. म्हणजे सरकार किंवा पोलिसांनी ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारायचे, तिथे मंत्री आणि त्यांच्या बगलबच्च्यांनीच ते स्वीकारले. मराठवाड्याला रझाकारांची पार्श्वभूमी जरूर आहे, पण त्याहून जास्त दहशत वाल्मीक कराड आणि टोळीकडून पसरविली गेली. अर्थात, अती झाले म्हणून या सर्व गोष्टी चव्हाट्यावर आल्या.
या टोळीची ‘मोडस ऑपरंडी’ (कार्यपद्धती) विद्यमान किंवा आधीच्या सत्ताधार्यांना ठाऊक नव्हती? सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवून अर्थकारणासाठी राजकारण करणार्यांच्या ‘लीला’ ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून सर्वांनाच ठाऊक होत्या. त्यांचे नाव यासाठी घेतले जाते, कारण धनंजय मुंडे आधी त्यांच्या पक्षात होते आणि नेतृत्वाचे निकटवर्तीय होते. मात्र, या लीलांना लगाम घालण्याची गरज वरिष्ठ नेत्यांनाही कधी वाटली नाही. त्यामुळेच ही मंडळी डोईजड झाली. अर्थात, प्रत्येक पक्षाला आक्रमक नेत्यांची गरज असते. विधिमंडळ असो, की जाहीर सभा. प्रश्न, वादांविषयी विरोधाकांना सडेतोड उत्तर देणार्या नेत्यांना मागणी असते. त्यामुळे कदाचित त्यांच्या ज्ञात-अज्ञात अवगुणांकडे कानाडोळा केला जात असावा.
राज्यभरात दणदणीत आक्रोश मोर्चे निघायला लागले, तेव्हा खंडणी प्रकरणातील वाल्मीक कराडला वगळून सात आरोपींना ‘मोका’ लावण्यात आला. त्यावरून आक्रोश झाला, तेव्हा वाल्मीकवरही ‘मोका’ लावण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. ज्या राज्यात गुन्हेगारांना अटक करण्यासाठी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलने करावी लागतात, गुन्हेगारांना अटक केल्यानंतरही त्यांच्या समर्थकांकडून प्रतिआंदोलने उभारली जातात, ते कायद्याचे राज्य मानता येत नाही. वाल्मीकवरील प्रत्येक कारवाईसाठी समाजाला, देशमुख कुटुंबीयांना आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे कराडला सरकार वाचवू पाहात आहे, या आरोपातील तथ्य बळकट होत चालले आहे. गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीचे एन्काऊंटर केले जाते आणि दुसर्या आरोपीला शाही वागणूक दिली जाते, हा फरक महाराष्ट्र पाहतो आहे.
6 डिसेंबर : आवादा कंपनीच्या आवारात मारहाणीची घटना.
9 डिसेंबर : संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोल नाक्याजवळून अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर अपहरणाचा, हत्येचा गुन्हा केज पोलिसांत दाखल करण्यात आला.
10 डिसेंबर : पुरवणी जबाबात सात आरोपींची नावे घेण्यात आली. यात जयराम चाटे, महेश केदार,
प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार. खंडणी प्रकरणातील वाल्मीक कराड यालाही अटक करण्यात आली.
10 डिसेंबर : ग्रामस्थांचे रोडवर ठिय्या आंदोलन. जरांगे-पाटलांची देशमुख कुटुंबाची भेट. आंदोलनात सहभाग. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती, ती मान्य करण्यात आली. पुढे या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.
10 डिसेंबर : रात्री दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार.
11 डिसेंबर : केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले,विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली.
27 डिसेंबर : वाल्मिक कराड यांच्या पत्नी कराड यांची सीआयडीकडून तीन तास चौकशी. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीदेखील चौकशी.
28 डिसेंबर : आरोपीच्या अटकेसाठी आक्रोश मोर्चा. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीचे मंजली कराड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन अंगरक्षक, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह आणखी चार ते पाच महिलांची सीआयडी चौकशी. केजमधील 50 ते 60 जणांची चौकशी.
31 डिसेंबर : खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये शरण. केज कोर्टामध्ये 14 दिवसांची पोलिस कोठडी.
14 जानेवारी : वाल्मीक कराड विरोधात मकोका दाखल. समर्थकांकडून विविध ठिकाणी जाळपोळ. कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी जमावबंदीचे आदेश.
घटना घडून गेल्यानंतर 20 दिवसांनी वाल्मीक कराड अलगद पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन बसला. त्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले, तेथे नवीन गाद्या आणि पलंगही पोहोचले. त्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा बंदोबस्तावरील पोलिसांसाठी हे ‘साहित्य’ आणल्याचा खुलासा प्रशासनाने केला. बंदोबस्तावरील पोलिसांना झोपण्यासाठी गाद्या-पलंग पुरविले गेल्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे.
वाल्मीक कराड याच्या पत्नीच्या नावाने पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये दोन फ्लॅट असल्याचे नुकतेच उघडकीस आले. विविध शहरांमध्ये त्यांनी अशी संपत्ती जमविल्याचे सांगितले जाते. अर्थात, ही संपत्ती जप्त होऊ नये, म्हणूनच त्याने आत्मसमर्पण केले असे मानले जाते. धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये 23 कोटींची आणि 2024 च्या निवडणुकीत आपली 53.17 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. वाल्मीक कराडचे बिंग हळूहळू फुटत चालल्यामुळे त्याच्या नावावरील संपत्ती धनंजय मुंडे यांच्यापेक्षा जास्त आहे काय आणि असे असेल तर त्याच्या उत्पन्नाचे स्रोत काय, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.