

छत्रपती संभाजीनगर : अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये एका महिन्यात ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने चिकलठाणा परिसरातील एका गृहिणीची २२ लाख ५ हजार ५०७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
स्वतः चार्टर्ड अकाउंटंट (सीए) असल्याचे भासवत या भामट्याने फसवणुकीसाठी स्वतंत्र टेलिग्राम ग्रुपचा वापर केल्याचे समोर आले आहे. ही घटना १३ ते ३० जून दरम्यान घडली. एमआयडीसी सिडको ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा आकाश आरके (३४, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यांना यूएस स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ३० टक्के नफ्याचे आमिष दाखवले. भामट्याने पाठवलेल्या लिंकवर त्यांनी १६ ते २९ जून दरम्यान फोन पे आणि मोबाईल बँकिंगद्वारे ४९ व्यवहारांतून एकूण २२ लाख ५ हजार ५०७ रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले.
३० जून रोजी घराच्या बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने मनीषा यांनी परतावा मागितला. मात्र, भामट्याने टाळाटाळ करत वैयक्तिक चॅट आणि ग्रुपवरील सर्व मॅसेज डिलीट करून पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनीषा यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवली. सहायक निरीक्षक कैलास लहाने पुढील तपास करत आहेत.