

Horrific collision between a truck and a two-wheeler at Kumbhephal Square; one dead, one injured
करमाड, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावरील शेंद्रा एमआयडीसी परिसरातील कुंभेफळ पोलिस चौकीसमोरील चौकात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण जखमी झाला. रविवारी (ता. ११) मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. ओमकार नारायण निकम (वय २०, रा. दाभाडी, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव असून, पवन शंकरराव बकाल (वय २५, रा. दाभाडी) हा जखमी झाला आहे. धडकेनंतर ट्रकने दुचाकी सुमारे १५० फूट फरफटत नेल्याने अपघाताची तीव्रता समोर आली. दरम्यान, चौकातील बंद सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार निकम आणि पवन बकाल हे दोघे दुचाकी (. एमएच २१ बीई ८४८३) वरून छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या दाभाडी गावी जात होते. रविवारी मध्यरात्री कुंभेफळ पोलिस चौकीसमोरील चौकात एमआयडीसी परिसरातून येणाऱ्या ट्रकची (. एमएच ४६ सीएल ३८२२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
धडकेनंतर ट्रक दुचाकीला फरफटत चौक ओलांडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. ओमकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी जखमी ओमकार निकम आणि पवन बकाल यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी ओमकार निकम याला मृत घोषित केले. पवन बकाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर करीत आहेत.
या चौकात कायमस्वरूपी वाहतूक सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, बंद सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करावी आणि अवजड वाहनांसह अन्य वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
बंद सिग्नलमुळे अपघातांचा धोकाशेंद्रा एमआयडीसी परिसरातील कुंभेफळ चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या अवजड वाहनांसह छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील वाहनांची या चौकातून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी सिसल यंत्रणा बंद असल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.