

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पावन भूमीत हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावला जातो, हा निधर्मी प्रशासनाचा मुजोरपणा आहे. सुरक्षा तपासणीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
शहरात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सीटीईटी परीक्षेच्या केंद्रावर हिंदू महिलांचे पवित्र मंगळसूत्र आणि दागिने उतरवायला लावल्याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयक प्रियांका लोणे यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या हिंदूद्वेषी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सारिका कोलते आणि रणरागिणी शाखेच्या श्रुती सिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लोणे म्हणाल्या, भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देते. परीक्षेच्या नावाखाली हिंदू महिलांची ही विटंबना संविधानाचा अपमान करणारी आहे.
परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवायला लावणे हा महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. जर हे दागिने चोरीला गेले असते तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असती का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. दोषी केंद्र प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदूंच्या मंगळसूत्र, जोडवी, नथ, बिंदी आदी धार्मिक अलंकारांना परी-क्षेला बसताना मुभा असल्याचे स्पष्ट परिपत्रक काढावे. तसेच भविष्यात असा प्रकार घडल्यास तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.