Encroachment removal : ऐतिहासिक वास्तू परिसरातील अतिक्रमणावर उद्या हतोडा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील अतिक्रमणावर आता थेट हतोडा पडणार असून, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय परिसरातील शाही मशिदीजवळ उभारण्यात आलेले मंगलकार्यासाठी लागणारे साहित्याचे गोडाऊन गुरुवारी (दि.१२) महापालिकेकडून हटवण्यात येणार आहे, अशी माहिती मंगळवारी (दि.१०) महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
आयुक्त श्रीकांत यांनी सांगितले की, शाही मशीद परिसर हा संरक्षित भाग असून, येथे कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण कायदेशीर नाही. संबंधित मंगलकार्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे गोडाऊन उभारून शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करण्यात आले आहे. यापूर्वीही या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र काही कालावधीनंतर पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम उभे राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यावरून गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होणार आहे. या मोहिमेसाठी मनपाचे अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग तसेच पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ऐतिहासिक वास्तू आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिका यापुढेही कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तडजोड न करता थेट कारवाई ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील अशा प्रकारच्या अतिक्रमणामुळे केवळ वारशालाच धोका निर्माण होत नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्नही निर्माण होतो, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

