

Heavy rain subsidy to be deposited in farmers' accounts today
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्याचा आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. गुरुव-ारी (दि.३०) तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज केले. शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे अनुदान यादी अंतिम करून शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १०१ कोटी रुपये अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिले आहे..
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकरी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी अनुदान तत्काळ मेळावा या मागणीसाठी पैठण येथे आंदोलन केले होते.
राज्य शासनाने घोषणा केलेले अनुदानाचे वाटप करण्याचा आदेश प्राप्त झाल्याने. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे प्रभाकर घुगे, कैलास बहुरे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके व तालुक्यातील विविध महसूल मंडळांतील तलाठी यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज पूर्ण केले. तालुक्यातील १९० गावांतील शेतकऱ्यांसाठी १०१ कोटींची रुपयांचे अतिवृष्टी अनुदान यादी पूर्णपणे केली. शुक्रवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१९० गावांतील ९६००० शेतकऱ्यांना फटका बसला होता. ७२००० जिरायत, २४४ बागायत व १६०३० हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्या होत्या. अनुदान रक्कम आता प्रत्यक्षात खात्यात जमा होणार असल्याने काही प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अडचण असल्यास लेखी अर्ज करा
अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज सादर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले.