

Heavy rain in Waluj Mahanagar area, bridge damage
श्यामसुंदर गायकवाड
वाळूज महानगर, वाळूजमहानगर परिसरात यंदा पावसाळ्यात पहिल्यांदा शनिवारी रात्री जोरदार मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नागझरी नदीला पूर येऊन नारायणपूर जवळील पूल खचल्याने नांदेड-आंबेगावचा संपर्क दुपारपर्यंत तुटला होता. तर वडगाव कोल्हाटी येथे रविवारी पहाटे एका घरावरील पत्राचे छत कोसळले. तसेच बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांच्या संसार उपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले.
वाळूज महानगर परिसरात शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. काही वेळानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने सिडको वाळूज महानगरातील सारा व्यंकटेश, अक्षय तृतीया, तापडिया इस्टेट, फुलोरा, सारा इलाईटेड, लेमन सिटी, ऑरेंज प्राईड खिवंसरा ईस्टेट, विजयालक्ष्मी सोसायटी, बजाजनगर येथील सह्याद्री, निलकमल हॉसिंग सोसायटी, सप्तशृंगी माता मंदिर भागातील प्लॉट क्रमांक २१० ते २१२, पंढरपूर येथील गिरीराज सोसायटी, रांजणगाव, अंबेलोहळ येथील अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्यामुळे घरातील पाणी बाहेर काढताना नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
या मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला मोठा पूर आला होता. यामुळे रविवारी दुपारपर्यंत नांदेडा आंबेगाव तसेच नारायणपूर या गावांचा संपर्क तुटला होता. वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नंदू पांडे हे कुटुंबासह राहतात. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे त्यांच्या घराचे पत्राचे छत खाली पडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पंढरपूर येथील कामगार चौकात अहिल्यानगर महामार्गावर दुतर्फा पावसाचे पाण्याचे तळे साचले होते. महामार्गावर साचलेल्या गुडघ्याभर पाण्यातून वाहने काढतांना वाहनांचा वेग मंदावल्याने रविवारी सकाळी याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
या चौकातून पुणे, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांची दिवस-रात्र वर्दळ सुरु असते. शिवाय वाळूज औद्योगिक क्षेत्रात कामासाठी वाळूज भागातून दुचाकीवरून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने महामार्गावर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून वाहतूक सुरळीत केली.
परिसरातील आसेगाव, खोजेवाडी, वळदगाव, आंबेलोहळ शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने शेतातील कपाशी, तुर, मका आदी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे करोडी, वडगाव, रांजणगाव, घाणेगाव, तिसगाव येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून जोगेश्वरी व खोजेवाडी येथील लघुसिंचन तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाळूज एमआयडीसीतील ए, बी, सी सेक्टर मधील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये पाण्याने पाणी शिरले. यामुळे उत्पादन तसेच रॉ-मेंटेरियलचे नुकसान होऊन उत्पादनावरदेखील याचा परिणाम झाला. यामुळे उद्योजकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला.