

पिशोर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर आणि परिसरातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कहर ओढवला आहे. दिवाळी सणाच्या दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मका आणि कापूस या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याचे निदर्शास आले.
शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून पेरणी केली. खतं, बी-बियाणे, औषधी फवारणीसाठी उसने पैसे, उधारी, बँकेचे कर्ज अशी सर्व बाजूंनी जोखीम घेतलेली असताना आता अति पावसामुळे पीकच सडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाने पूर्वी मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाही रुपयाची मदत जमा झालेली नाही. “आमचं पीक गळून गेलं, शेतं दलदलीत बुडाली, पण नेतेमंडळी मात्र निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. कोपरवेल येथील शेतकरी शिवाजी शामराव धुमाळ यांच्या शेतातील मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याचे दिसून आले. हीच स्थिती संपूर्ण तालुक्यात आहे. शेतकरी हतबल झाला असून त्याला लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.