

प्रमोद अडसुळे
छत्रपती संभाजीनगर: क्षणाचा राग आणि आयुष्याची राख. अनेकदा क्षुल्लक वादातून रागाचा पारा चढतो आणि त्याच भरात माणसाच्या हातून भयंकर गुन्हा घडतो. जेव्हा रागाची नशा उतरते, तेव्हा हाती उरलेले आयुष्य काढण्यासाठी कारागृहाच्या अंधाऱ्या कोठड्याच वाट्याला येतात. आता सर्व काही संपले या नैराश्यात खितपत पडलेल्या याच कैद्यांच्या आयुष्यात हसूल मध्यवर्ती कारागृहाने नवा आशेचा किरण पेरला आहे.
ज्या हातांनी रागाच्या भरात शस्त्रे उचलली होती, गंभीर गुन्हे केले तेच हात आता पुस्तके आणि लेखणी हाती घेऊन उच्च शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हर्मूल कारागृह आता केवळ शिक्षा भोगण्याची जागा राहिली, नसून, 'गुन्हेगाराचा पुन्हा माणूस' घडवणारी शाळा बनत आहे. गेल्या चार वर्षांत इथे १८ जणांनी पदवी प्राप्त केली आहे.
सध्या हसूल कारागृहात सुमारे २ हजार बंदी आहेत. यातील बहुतांश जण आपल्या भूतकाळात झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेत आहेत. त्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढून भविष्याचा सोनेरी मार्ग दाखवण्यासाठी कारागृह प्रशासनाने शिक्षणाचे दरवाजे खुले केले आहेत. कारागृहातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे चालवली जात आहेत.
कैद्यांना गुन्हेगारीच्या अंधारातून शिक्षणाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या या मोठ्या बदलासाठी कारागृह अधीक्षक अनिल खामकर आणि अतिरिक्त अधीक्षक सचिन साळवे यांच्या मार्गदर्शनात कारागृहातील शिक्षक गणेश मुटकुळे तसेच अन्य तीन शिक्षक हे बंद्यांना पदोपदी शैक्षणिक मार्गदर्शन करत आहेत. यामुळेच एकेकाळचे गुन्हेगार आता सुशिक्षित नागरिक बनून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत तब्बल १२ कैद्यांनी पदवी तर ६ जणांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
५३३८ पुस्तकांचे ग्रंथालय ठरतेय दीपस्तंभ
एकांत आणि रिकाम्या वेळेत कैद्यांना नैराश्य ग्रासते. यावर मात करण्यासाठी कारागृहात तब्बल ५,३३८ पुस्तकांचे अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील या पुस्तकांनी कैद्यांना वाचनाची गोडी लावली आहे. अनेक बंदी आपल्या आवडीची पुस्तके बेरेकमध्ये नेऊन वाचतात. स्वतःच्या हक्कांची आणि कायद्याची जाण यावी यासाठी कायदेविषयक पुस्तकांचा स्वतंत्र विभागही येथे आहे. ही पुस्तकेच आता या बंद्यांचे खरे समुपदेशक आणि गुरू ठरत आहेत.
पदवीत 'अंडरट्रायल' कैद्यांची संख्या अधिक
वयोमानामुळे आणि जुन्या नोंदी नसल्यामुळे त्यांच्याकडे पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली कागदपत्रे बहुतांश वेळा उपलब्ध नसतात. त्यामुळे शिक्षणाची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना प्रवेश घेता येत नाही. याउलट तरुण वयात कारागृहात आलेल्या आणि सध्या 'अंडरट्रायल' कैद्यांचा पदवी प्रवेशाकडे सर्वाधिक ओढा असल्याचे दिसते. मात्र, अनेकदा खटल्याचा निकाल लागून हे कैदी मुक्त होतात किंवा त्यांना जामीन मिळतो. सुटका झाल्यामुळे पदवीचे शिक्षण अनेकदा अपूर्णच राहते, असेही काही प्रकरणे आहेत.
शिक्षणाकडे वाढता ओढा
वायसीएमओयू : या माध्यमातून बी.ए. आणि बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी २४ बंद्यांनी नोंदणी केली आहे.
इयू : बी.ए., एम.ए. तसेच 'फूड अॅड न्यूट्रिशन', मानवी हक्क अशा विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी तब्बल १५२ बंद्यांनी प्रवेश घेतला आहे.
प्रशासनाकडून त्यांना पुस्तके मोफत दिली जातात आणि परीक्षाही कारागृहातच घेतली जाते.
पदवी मिळविल्यास ६ महिने शिक्षामाफी
शिक्षणाकडे अधिकाधिक कैद्यांचा ओढा वाढावा म्हणून प्रशासनाने एक भावनिक आणि व्यावहारिक योजना राबवली आहे. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यास २० दिवस आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यास आणखी २० दिवस, अशी एकूण १८० दिवसांची (सहा महिने) 'शिक्षामाफी' दिली जाते. 'शक्षिण घेतले तर लवकर घरी जाऊन कुटुंबाला भेटता येईल', या आशेपोटी कैदी मोठ्या संख्येने अभ्यासाकडे वळत आहेत.
हाताला काम अन् जगण्याची नवी उमेद
पुस्तकी ज्ञानासोबतच शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर नव्याने आयुष्य उभे करता यावे, यासाठी कारागृहात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमही चालवले जातात. सुतारकाम, बेकरी उत्पादने, शिवणकाम, सलून टेक्निक, वॉटर मॅनेजमेंट आणि संगणक प्रशिक्षण असे कौशल्य विकासाचे धडे कैद्यांना दिले जात आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शासकीय प्रमाणपत्र दिले जाते, बाहेर पडल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरू करणे सोपे होते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इथे संगणकाचे ज्ञानही दिले जाते.