

Gram sevak caught by ACB while taking bribe of Rs. 10,000
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रहाळपट्टी तांडा, जटवाडा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. २४) रंगेहाथ पकडले.
टीव्हीसेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. राजोबा विठोबा काथार (५०, रा. वसंतनगर, जाधववाडी) असे आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे नोकरीला असलेल्या कंत्राटदाराने मौजे रहाळपट्टी येथे ग्रामनिधी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले होते. या कामाचे बिल ग्रामसेवक काथार याने मंजूर करून ते कंत्राटदाराला अदा केले होते.
बिल अदा केल्याचे वक्षीस म्हणून काथार याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने १६ फेब्रुवारी रोजी केलेल्या पडताळणीमध्ये ग्रामसेवक काथार याने २० हजारांची मागणी करून तडजोडी अंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार मंगळवारी टीव्हीसेंटर येथील हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. तिथे पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने काथार याला रंगेहाथ अटक केली. आरोपी काथारच्या जाधववाडी येथील घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.