

Concrete packing left, but it's still time for Padwa
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी टाकण्यात आलेल्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जॅकवेलपासून सुमारे ८७ ठिकाणी सिमेंट काँक्रिटची पॅकिंग दिली आहे. त्यातील काही कामे निकृष्टदर्जाची झाल्याचा अहवाल न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने दिला. तसेच अर्धवट कामे असल्याने आताच त्यातून पाणीपुरवठा करणे योग्य होणार नसल्याचेही सांगितले. मात्र असे असतानाही शिल्लक कामे १५ दिवसांत पूर्ण करून जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची घाई नेमकी आताच का केली जात आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानुसार मार्च अखेरीस शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळेल, असा दावा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केला आहे. आतापर्यंत सुमारे आठ ते दहा वेळा डेडलाईन देण्यात आली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकारण, महापालिका यांना कंत्राटदार एजन्सीकडून काम पूर्ण करून घेण्यात यश आले नाही.
काम पूर्ण झाल्यावरच पुरवठा
अद्याप काही कामे शिल्लक आहेत. परंतु ती कामे येत्या १५ मार्चपर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. त्याबाबत कंत्राटदार एजन्सीच्या प्रमुखांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या १५ दिवसांत जलवाहिनीतून पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले.
कंत्राटदार काम सोडून जाईल, या भीतीने कारवाई करणे योग्य होणार नाही, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (दि.१९) शिवजयंतीच्या दिवशी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या न्यायालयीन समितीने जायकवाडीतील जॅकवेल, मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत सद्यस्थितीची छायाचित्रे काढली.
दरम्यान, ही संपूर्ण माहिती आणि छायाचित्रे न्यायालयात सादर करून जॅकवेलची स्वच्छता झाली नाही, मुख्य जलवाहिन्यांच्या काँक्रिट पॅकिंगची ८७ ठिकाण असून, त्यापैकी अनेक खराब झाली. योग्यरीत्या पॅकिंग नाही. त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. काही कॉलम डिझाईप्रमाणे नाहीत, अशी माहिती समितीने सादर केली.
त्यावर उच्च न्यायालयाने महापालिका, एमजेपी आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे कर्मचारी यांनी कोणती कामे शिल्लक आहे, किती दिवसांत पूर्ण होतील, पाणीपुरवठा सुरू केल्यास काय नुकसान होईल, त्याची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त जी. श्रीकांत, एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी पाहणी केली. त्यात आयुक्तांनी १५ दिवसांत शिल्लक कामे पूर्ण करा, असे आदेश कंत्राटदार जीव्हीपीआरला दिले. तसेच गुडीपाडव्यापर्यंत पहिला पंप सुरू करू, असे संकेत दिले.
८ काँक्रिट पॅकिंग चेअरचे काम निकृष्ट
जाकयवाडी धरणात जॅकवेलपर्यंत टाकण्यात आलेल्या पुलावर जलवाहिनीला सिमेंट काँक्रिटीची पॅकिंग देण्यासाठी चेअर तयार केल्या आहेत. मात्र हे काम निकृष्टदर्जाचे झाले, हे समितीला कळाले, परंतु महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांचे काय, तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या एजन्सीला कसे दिसले नाही. आता या निकृष्ट ८ काँक्रिट पॅकिंग तोडून त्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे.