

Gram crop benefited from cold weather
पिशोर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील पिशोर - नाचनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी रब्बी हंगामात पेरणी पूर्ण झाल्यानंतर हरभरा, पिकाने चांगली भरघोस वाढ घेतली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
थंडीचे स्थिर वातावरण आणि दिवस-रात्र तापमानातील संतुलन याचा हरभरा पिकाला मोठा फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे उत्पादन लक्षणीयरीत्या घटले होते. परंतु यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच योग्य हवामान लाभल्याने पिकामध्ये फुले येणे वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी निरी-क्षणादरम्यान पिकाची वाढ समाधानकारक असल्याचे सांगितले.
काही ठिकाणी पेरणी उशिरा झाली असली, तरी थंडीची चांगली लहर सुरू राहिल्यास उशिराच्या पेरणीलादेखील हे वातावरण पूरक ठरणार आहे. शेतकरी वर्ग सध्या आळवणी, निंदण आणि कीडनियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त असून पिकाच्या वाढीकडे विशेष लक्ष देत आहेत.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पालेभाजी कीड, रसशोषक कीड किंवा चुरडा-मुरडा रोगाची लक्षणे दिसल्यास तत्काळ सल्लागार केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी पिकांमध्ये कोणताही मोठा रोगप्रादुर्भाव दिसत नसून हवामानात स्थिरता राहिल्यास उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे
बाजारभाव स्थिरची शक्यता
यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळाल्यास बाजारभावही स्थिर राहण्याची शक्यता असून शेतकरी वर्गाला आर्थिक दिलासा मिळण्याची आशा आहे. गेल्या काही वर्षांतील नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.