

Government Cancer Hospital: Completes 13 years of continuous service to cancer patients
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या लाखो रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालय आशेचा किरण ठरत आहे. या रुग्णालयाला आज रविवारी (दि.२१) १३ वर्ष पूर्ण होत असून, येथील आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अविरत सेवेमुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळाले आहे, अशी माहिती संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
२१ सप्टेंबर २०१२ साली आमखास मैदानासमोरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले. केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील रुग्ण येथे उपचार घेतात. विविध शासन योजनांसह रुग्णांना शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमो थेरपी सारख्या सर्व प्रकारच्या उपचार एकाच छताखाली निःशुल्क दिल्या जातात. २०१६ मध्ये रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. यावर्षी २७ एप्रिल २०२५ रोजी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा विस्तार आणि ३ टेस्ला एमआरआय मशीन, १२८-स्लाइस सीटी स्कॅन, मॅमोग्राफी युनिट आणि रोबोटिक शस्त्रक्रिया युनिटसारख्या आधुनिक उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. याचा रुग्णांना फायदा होत आहे.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनात ओएसडी डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह डॉ. अजय बोराळकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. अनघा वरुडकर, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. दर्पण जक्कल अशा अनेक तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांची टिम, आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत अहोरात्र झटत आहेत.
राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता मिळाल्यानंतर एनएमसीकडून हॉस्पिटलला एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी-२, एमसीएच सर्जिकल ऑन्कोलॉजी -३, डीएम पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी-४, डीएम ' मेडिकल ऑन्कोलॉजी ४, एमसीएचस्त्रीरोगविषयक ऑन्कोलॉजी -४, डीएम ऑन्कोपाथोलॉजी-४, एमसीएच हेड नेक सर्जरी-२ या सहा विषयांमध्ये सुपर स्पेशालिटी कोर्सेसचे बळ मिळाले आहे.
राज्य कर्करोग संस्थेकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा सुरू करणे, पीपीपी मॉडेल अंतर्गत पेट स्कॅन, स्वतंत्र रक्तपेढी, आण्विक प्रयोगशाळा, अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा, प्रेसिजन थेरपी, अनुवांशिक प्रयोगशाळा, एमआर लिनेंक सारख्या आत्याधुनिक सुविधा या संस्थेत सुरू होणार आहेत.