

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज्यातील आणि मुंबईतील जनतेची पहिली चॉईस ही महायुतीच राहणार आहे. काहीही झाले तरी जनता ही विकासालाच साथ देणार आहे, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिकलठाणा विमानतळावर केला. फुलंब्रीतील एका सभेच्या निमित्ताने ते बुधवारी (दि. १७) जिल्हा दौऱ्यावर आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल कर्मचारी विधिमंडळातील निर्णयानंतर संपाचा इशारा देतील, अशी अपेक्षा नव्हती. मागील दहा वर्षापासून महसूलच्या विविध पदांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या, त्या एका वर्षात निकाली काढल्या. तरीही असे होतेय, हे चुकीचे असून, आठ महिन्यांपासून ही चौकशी सुरू आहे.
९० हजार ब्रासवर उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीतून पुढे आले. १९९६ ते २०२३ पर्यंत जे महसूल अधिकारी भंडारा, पालघममध्ये होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. असे असताना सरकारवर दबाव निर्माण करून असे निवेदन देणे योग्य नाही. तरीही त्यांना चर्चेसाठी बोलवल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये जे कोणी येत असतील, त्या सर्वांचे स्वागतच आहे. सातव या चांगल्या कार्यकत्यों असून, त्यांना संधी देणे आवश्यक आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयात अपील करण्याची संधी आहे.शेवटी कायदेशीर कारवाईपुढे काही बोलता येत नाही, असेही ते म्हणाले. तर ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर ते म्हणाले की, जनतेची चॉईस महायुती असून, २०२९ मध्ये मुंबई कशी असेल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आराखडा तयार केला. त्याच विकासाला जनता साथ देणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.