

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची मोठ्या प्रमाणावर झिज होत आहे. ही झिज थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भक्तांसाठी बाह्य दर्शनाचा पर्याय लागू करण्याचा विचार सुरू आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे.
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांना मंदिराच्या थेट गाभार्यात प्रवेश दिला जातो. मंदिरात भाविक पिंडीवर विविध प्रकारची पाने, फुले वाहतात. या सर्वांमुळे ज्योतीर्लिंगाची झिज होत असल्याचे दिसून येत आहे. पुरातत्व विभागानेही तसे कळविले आहे.
म्हणून आता जिल्हा प्रशासनाकडून भाविकांचे मंदिर गाभार्यातील दर्शन बंद करून बाह्य दर्शनाचा विचार सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे. मंदिर समितीने बाह्य दर्शनाचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्यास तेथे काय उपाययोजना करता येतील, याबाबत सर्वानुमते विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. मंदिराच्या गाभार्यात जाऊन दर्शन घेताना काही नियम आहेत. त्यामुळे भाविकांचीही तारांबळ उडते. त्यामुळे बाह्यदर्शन अथवा इतर काही व्यवस्था करण्याबाबत समितीने विचार करून प्रस्ताव दिला तर प्रशासन त्यावर विचार करील, असेही ते म्हणाले.
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी याआधी १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. आता मंदिराच्या आतील सुधारणेसाठी ८० कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र आराखड्यातील कामांची पूर्तता अद्याप झाली नाही. याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. तसेच मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.