

खुलताबाद : बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पहाटेच्या वेळी दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यावरून स्थानिक भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळेत स्थानिक नागरिक आणि महिनाभर पायी वारी करणाऱ्या भक्तांना थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. याच प्रथेनुसार, खुलताबाद येथून पायी आलेल्या काही तरुण भाविकांनी थेट प्रवेशाची मागणी केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्यांना रांगेतून येण्यास सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.
सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण काही वेळातच वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित इतर भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. यानंतर मंदिर विश्वस्त मंडळ आणि संबंधित भाविकांनी सामंजस्याने या प्रकरणावर पडदा टाकला आहे. सध्या मंदिरात दर्शनाची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू असून, परिसरात शांतता आहे.