Water Supply : पावसाळ्यातही वाढला पाणीपुरवठ्यातील गॅप

▶ आठ दिवसांवरील पुरवठा पुन्हा १० ते ११ दिवसांवर, वाढीव ४० एमएलडी पाणी पाच दिवसांपासून बंद
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पावसाळ्यातही मिळेना मुबलक पाणी Pudhari News Network
Published on
Updated on

Gap in water supply widens even during the monsoon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा गॅप आठ दिवसांपर्यंत कमी होण्यास सुरुवात झाली होती, परंतु नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने शहराला पुन्हा जुन्या १० ते ११ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाही अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Sambhajinagar News
Water Supply : शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याची डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता

शहराचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेच्या आर्थिक सहभागातून उभारली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) जीव्हीपीआर कंपनीकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेतून वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतर अनेक भागांमध्ये दहा दिवसांचा गॅप कमी होऊन आठ दिवसांवर आला होता.

मात्र नक्षत्रवाडी येथील नव्याने उभारलेल्या पंपहाऊसच्या स्लॅबमधून पाणी झिरपत असल्याने विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी २४ जूनपासून वाढीव पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या स्लॅबमधून झिरपणारे पाणी थेट विद्युत पॅनलकडे येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ताडपत्री लावून संरक्षण करण्यात आले आहे.

Sambhajinagar News
Water crisis : नांदेडमध्ये पाणीबाणी; विष्णुपुरी प्रकल्पात ३८ टक्केच पाणीसाठा

सध्या गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वाढीव पाणीपुरवठा बंद झाल्याने मरीमाता जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या तसेच इतर अनेक भागांतील नागरिकांना पुन्हा १० ते ११ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा असताना पुन्हा जुन्या वेळापत्रकावर परतावे लागल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता १० दिवसांवर

सामान्यतः पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होते. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. मरीमाता जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या किराडपुरा, बायजीपुरा, बारी कॉलनी, इंदिरानगर, पोलिस कॉलनी आदी भागांमध्ये आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता १० ते ११ दिवसांनी मिळत आहे. यासह हनुमान टेकडी, जयविश्वभारती कॉलनी, चिकलठाणा, ज्योतीनगर, चौधरी कॉलनी, शहागंज यासह इतर अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचाही गॅप वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आठ दिवसांचा दिलासा ठरला अल्पजीवी

नवीन योजनेतून वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा गॅप दहा दिवसांवरून आठ दिवसांवर आला होता. मात्र पंपहाऊस दुरुस्तीसाठी वाढीव पुरवठा बंद झाल्याने हा दिलासा काही दिवसांचाच ठरला. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच वाढीव पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news