

Ganesh Darshan: Trains on various routes filled with Ganesh devotees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेश-ोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे पाहण्यासाठी दरवर्षी शहरवासीय मोठ्या प्रमाणात गणेश दर्शनासाठी पुणे, मुंबई गाठतात. याप्रमाणे अनेकांनी याची तजवीज आगोदरच करून ठेवल्याने सर्वच मार्गावरील रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत. दरम्यान मुंबईकडे जाणारा गणेशभक्त संभ्रमात असून, मराठा आरक्षणाच्या गर्दीमुळे अनेकांनी पुण्यालाच पसंती दिली आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरवासीय पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जातात. तसेच मुंबई येथील लालबाग राजाच्या दर्शनासाठी अनेक जण जातात. दरम्यान यावर्षी मराठा आरक्षणामुळे मुंबई ठप्प झाल्याने मुंबईकडील गणेशभक्त पुण्याकडे वळला आहे. दरम्यान पुणे, मुंबईचे नियोजन एक महिना आगोदरच केल्याने सर्वच रेल्वे फुल्ल झाल्या आहेत. अनेकांनी मुंबईचे अॅडव्हान्स बुकिंग रद्द केले आहे. असे असले तरी आजही अनेकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.
मुंबई ठप्प झाली असली तरी आजही अनेक जण मुंबईला जाण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, पुणे एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. याशिवाय इतर धार्मिकस्थळी जाणाऱ्या रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. त्यात साईनगर शिर्डी, तिरुपती एक्सप्रेससह इतर मागाँवरील रेल्वेला वेटिंग आहे. या मार्गावरील सर्वच रेल्वेंना कमी अधिक प्रमाणात ऑक्टोबरपर्यंत वेटिंग असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मुंबईत सध्या मराठा आरक्षणामुळे कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने अनेकांनी मुंबईऐवजी कोकणात जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अनेकांनी पुण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईपेक्षा पुणे आणि कोकणात शहरातील गणेशभक्तांची गर्दी पाहावयास मिळणार आहे.