Sambhajinagar News : जाधववाडीतील श्रीराम ट्रस्टच्या ४१ एकरांवरील भूखंडांची सर्रास विक्री

मनपा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप; दबावामुळे कारवाई सोडली अर्धवट
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जाधववाडीतील श्रीराम ट्रस्टच्या ४१ एकरांवरील भूखंडांची सर्रास विक्रीfile photo
Published on: 
Updated on: 

Free sale of 41 acres of land belonging to Sriram Trust at Jadhavwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जाधववाडी बाजार समिती परिसरातील श्रीराम मंदिर संस्थान आणि बालाजी मठाच्या मालकीच्या तब्बल ४१ एकर जमिनीवर कथित अवैध प्लॉटिंग करून भूखंडांची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप गुरुवारी (दि. १२) एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी केला. गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील सुमारे ८० टक्के क्षेत्रावर अनधिकृत प्लॉटिंग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Sambhajinagar News
Sambhajinagar Firecracker Pollution : शहराच्या प्रदूषणात दुपटीने वाढ, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता ढासळली

महापालिका आयुक्त आणि संनियंत्रण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, अतिक्रमण हटाव पथकाने प्रत्यक्ष कारवाई अर्धवट सोडली आणि दोन्ही गट क्रमांक अद्याप बंद केलेले नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा शुक्रवारी (दि. १३) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करावा लागेल, असा इशाराही समीर साजिद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

जाधववाडीतील गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील ४१ एकर जमीन श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे. ही जमीन कोणत्याही खासगी व्यक्तीची मालमत्ता नसताना तिच्या मोठ्या क्षेत्रावर अनधिकृतपणे प्लॉट पाडून विक्री करण्यात आल्याचा आरोप गुरूवारी समीर साजिद बिल्डर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त आणि संनियंत्रण अधिकारी यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.

Sambhajinagar News
Diwali 2026 : दीपोत्सवाच्या चार दिवसांत दोन हजार कोटींची उलाढाल

त्यानंतर प्रशासनाने रात्रीच पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. दरम्यान, महापालिका अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे हे पथकासह अतिक्रमण हटविण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, ८० रस्त्यांपैकी केवळ एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम तोडल्यानंतर अचानक कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी कारवाई थांबवून माघार घेतली, असा आरोप साजिद यांनी केला.

हा फोन नेमका कोणाचा होता, याचा खुलासा वाहुळे यांनी लोकप्रतिनिधींसमोर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महापालिकेच्या नियमानुसार अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकाने कारवाई पूर्ण केल्यानंतरच परतणे अपेक्षित आहे. यासह कारवाई झालेल्या ठिकाणचा संबंधित गट क्रमांक बंद करून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आवश्यक असते. मात्र, श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जमिनीवरील प्रकरणात बुधवारपर्यंत गुन्हा दाखल सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा साजिद यांनी केला.

गुन्हा दाखल झाला असला, तरी दोन्ही गट क्रमांक अद्याप बंद का करण्यात आले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, ट्रस्टच्या जमिनीचा उपयोग रुग्णालय, शाळा आणि सामाजिक कार्यासाठीच व्हावा. या जमिनीचा व्यावसायिक वापर करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. अवैध प्लॉटिंग, भूखंडविक्री, अर्धवट कारवाई, गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि दोन्ही गट क्रमांक बंद न करण्यामागील कारणे याबाबत प्रशासनाने सविस्तर खुलासा करावा अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.