

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक निर्णय म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमातून ही सेवा कार्यान्वित झाली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना डायलिसिससाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर शहराकडे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिसची गरज भासत असल्याने त्यांचे हाल अधिक वाढत होते. ही अडचण लक्षात घेऊन आ. प्रशांत बंब यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात ही अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात यश आले.
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत गरीब व गरजू रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आवश्यक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तंत्रज्ञ व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार आहेत.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र रुग्णांची नोंदणी करून नियोजित वेळा-पत्रकानुसार डायलिसिस करण्यात येणार आहे. उपचारादरम्यान आवश्यक तपासण्या व वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे.
रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर यांनी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचार टाळू नयेत. शासनाची ही योजना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला
स्थानिक स्तरावर डायलिसिस सेवा सुरू झाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये यामुळे महत्त्वपूर्ण भर पडली असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने हा सकारात्मक टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, डायलिसिस सेवा यापुर्वी नसल्याने ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत होते. त्यांना इतर शहरात उपचारसाठी जावे लागत होते. यात त्यांचा वेळ ही जात होता शिवाय आर्थिक भार देखील सहन करावा लागत होता. वेळेत उपचार मिळण्यास देखील अडचण येत होती. आता या समस्या दूर होणार असल्याने रुग्ण व नातेवाईकांत समाधान आहे.