Chhatrapati Sambhajinagar Crime : कमिशनसाठी बँक खाती भाड्याने देणाऱ्या चौघांवर गुन्हे

येस बँकेतील 'म्युल अकाउंट्स'चा पोलिसांकडून पर्दाफाश; देशभरातील फसवणुकीचे तब्बल २२ लाखांहून अधिक रुपये खात्यांमध्ये जमा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गुंतवणूक, पार्ट-टाईम जॉबची आमिषे किंवा डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निष्पाप नागरिकांना लुटणाऱ्या संघटित सायबर भामट्यांची पाळेमुळे शहरात खोलवर रुजल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी कमिशनच्या आमिषापोटी स्वतःची बँक खाती भाड्याने देणाऱ्या शहरातील चौघांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या चारही आरोपींची खाती एकाच येस बँकेत असून, या खात्यांमधून अल्पावधीतच तब्बल २२ लाख २८ हजारांहून अधिक रुपयांची बेकायदेशीर उलाढाल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

असा झाला म्युल अकाउंट्सचा पर्दाफाश

सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सुप्रिया मिरके, अमोल सोनटक्के, सुशांत शेळके, नितीन देशमुख, ज्योती बोटे यांच्या पथकाने भारत सरकारच्या एनसीआरपी आणि समन्वय पोर्टलवरील सायबर गुन्ह्यांच्या पैशांच्या मनी ट्रेलचे सखोल विश्लेषण केले. त्यावेळी सूतगिरणी चौक परिसरातील येस बँकेच्या शाखेतील काही विशिष्ट खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची मोठी रक्कम देशभरातून जमा होत असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम खात्यात जमा होताच एकाच दिवसात धनादेश किंवा एटीएमद्वारे काढून घेतली जात होती. या खात्यांविरुद्ध देशभरातून डझनभर सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्याचे झाल्यानंतर पोलिसांनी या खात्यांचे बँक स्टेटमेंट तपासले आणि या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

Crime News
Frozen Bank Account Cyber Fraud: सायबर फसवणुकीत फ्रीज बँक खात्यांना दिलासा; I4C कडून नवीन GRM यंत्रणा लागू

या चौघांवर गुन्हे दाखल

आवेज मसुद शेख (रा. सादातनगर) : याच्या खात्यातून २९ डिसेंबर ते ८ जानेवारी या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाख ८० हजार रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले. सिद्दिकी फराज अहमद (रा. कटकटगेट, टाईम्स कॉलनी) : या आरोपीच्या बँक खात्याचा वापर करून सायबर भामट्यांनी तब्बल ५ लाख ५३ हजार रुपयांची सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून धनादेशाद्वारे काढून घेतली.

आशिष सुभाष इंगळे (रा. हसूल, जेल क्वार्टर) : याच्या खात्यावर विविध राज्यांतील तक्रारींमधून आलेली ६ लाख ८० हजार रुपयांची बेकायदेशीर उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सचिन धर्मराज जाधव (रा. नवीन टेंभा, पैठण): याने आपले खाते सायबर भामट्यांना वापरण्यास दिल्याने, त्याच्या खात्यातून सर्वाधिक ८ लाख १५ हजार ३०८ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.

कमिशनसाठी टोळीला केली सक्रिय मदत

या चारही आरोपींनी जाणीवपूर्वक आणि केवळ कमिशनच्या मोबदल्यात संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला आपली बँक खाती वापरण्यास दिली होती. देशभरातील पीडितांकडून फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारणे, ती लपवणे आणि धनादेशाद्वारे काढून ती सायबर टोळीपर्यंत पोहोचवणे यासाठी या सर्वांनी सक्रिय मदत केली आहे. हे सर्वजण या सायबर टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे तपासात उघड झाले असून, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Thane Crime : बनावट बँक खाती उघडून ऑनलाईन फ्रॉड करणारी मोठी टोळी गजाआड

आणखी चार गुन्हे दाखल होणार- पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेप्रमाणे सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांना विविध पोलिस ठाणे दत्तक देण्यात आले आहेत. हे पथक संबंधित ठाण्याच्या हद्दीतील सायबर गुन्ह्यांशी संबंधित बँक खात्यांचा शोध घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करत आहेत. पैशाच्या आमिषापोटी सायबर भामट्यांना स्वतःची बँक खाती भाड्याने देणाऱ्या एमआयडीसी सिडको २, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक अशा आणखी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news