

Four-and-a-half-hour discussion on sugarcane price hike
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: उस दरवाढीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत वाढीव दराची मागणी केली. परंतु, १० पैकी ९ कारखानदारांनी दरवाढ देण्यास सपशेल नकार दर्शविला. केवळ पंचगंगा शुगरकडूनच ३५०० रुपये दर देण्याची सहमती दर्शविण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना कोणताही निर्णय न होताच रिकाम्या हाताने परतावे लागले. आमदार प्रशांत बंब यांनी मध्यस्थीलाही यश आले नाही.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, प्रादेशिक साखर सहसंचालक विशाल जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते. ऊस दरवाढीच्या मागणीवरून जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.
याच संतापातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखान्यांसमोर आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व साखर सहसंचालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसउत्पादक शेतकरी संघटना व साखर कारखाने यांची दरवाढीसाठी बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. त्यात दहा सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यातही ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ३९०० आणि ३०० असे ४२०० रुपये दर कारखान्यांनी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांकडून या दरवाढीकडे सपशेल कानाडोळा केला. किमान पहिली उचल ३५०० हून अधिक द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवतो, असे उत्तर दिले.
संत एकनाथ कारखान्याने एफआरपी २,४९० रुपये असल्याचे सांगत २,९०० रुपयांपेक्षा अधिक उचल देणे शक्य नसल्याचे सांगितले. मुक्तेश्वरकडून ३,१००, अन् बारामती अॅग्रोने ३,२११, छत्रपती संभाजी राजे ३,००१ रुपयांची पहिली उचल जाहीर केली. त्यामुळे शेतकरी व संघटनांचे पदाधिकारी संतापले. दुष्काळाची स्थिती लक्षात घेत पंचगंगा शुगरने ३,५०० रुपयांची उचल जाहीर केली.
जळालेल्या ऊसाला कमी दर
महावितरणाच्या नाकरर्तेपणामुळे शेतकऱ्यांचा उभा उस जळतो. अन् या जळालेल्या उसाला कारखान्यांकडून ३०० ते ५०० रुपयांनी कमी दर दिला जातो. शासनामुळेच नुकसान होत असल्याने या उसाला कमी दर देऊ नये, अशी मागणी करीत एका शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. त्यावर शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही.
१५ दिवसांनंतर पुन्हा बैठक
बारामती अॅग्रोतर्फे 'ज्यांना जमेल त्यांनीच ऊस आमच्या कारखान्याला द्यावा', असे वक्तव्य करण्यात आले. यावर आपण दुःखी झाल्याचे सांगत आमदार प्रशांत बंब म्हणाले, सर्व कारखान्यांच्या मागील आणि यंदाच्या रिकव्हरीची पडताळणी करण्यात येईल. १५ दिवसांत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल.
अव्वल दर दिल्याने पंचगंगाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बैठकीतील १० पैकी केवळ पंचगंगा शुगरनेच शेतकऱ्यांच्या विनंतीवरून आणि दुष्काळी स्थिती लक्षात घेत दरवाढ देण्याचा निर्णय घेतला. अन् पहिली उचल ३३०० रुपये व त्यानंतर दोन वेळा शंभर रुपये असे एकूण ३५०० रुपये दिल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे बैठकीत पंचगंगा शुगरच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन प्रभाकर शिंदे, संचालक कॅप्टन प्रशांत माने, सचिन माने, विवेक शिंदे, प्रबोध शिंदे यांची उपस्थिती होती.