

Forester, saw mill owner caught in bribery trap
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वन परिक्षेत्र कार्यालयाच्या फिरत्या पथकातील वनपालाने लाकडाने भरलेला आयशर वाहन ३ जुलै रोजी पकडून चिकलठाणा एमआयडीसीतील एस के - सॉ मिलमध्ये लावले. त्यानंतर टेम्पो मालकाकडे १ लाख रुपयांची मागणी केली. गुरुवारी (दि.१०) ४० हजारांत तडजोड करून सॉ मिल मॅनेजरच्या हस्ते लाचेची रक्कम स्वीकारली.
वनपाल मनोज त्रंबक कुमावत, सॉ मिल मालक सय्यद इमरोज सय्यद खाजा आणि मॅनेजर शेख अब्दुल मुजाहिद शेख कबीर (३३, दोघेही रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मॅनेजरला अटक केली, मात्र वनपाल कुमावत आणि सॉ मिल मालक इमरोज पसार झाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यात तक्रारदाराचा सॉ मिलचा व्यवसाय आहे. लाकूड वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडे आयशर वाहन आहे. लाकूड भरून वाहन तक्रारदाराचा भाऊ संभाजीनगर येथे जात असताना ३ जुलै रोजी रात्री दोनच्या सुमारास झाल्टा फाटा येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या फिरत्या पथकातील वनपाल कुमावतने पकडले. वाहन चिकलठाणा एमआयडीसी भागातील एसके सॉ मिल येथे नेऊन लावले. दुसऱ्यादिवशी तक्रारदार हे एसके सॉ मिलवर गेले. तिथे वनपाल कुमावत भेटला. त्याने मंगळव ारी (दि.८) मला छत्रपती संभाजीनगर येथे भेटा असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी तक्रारदार कुमावतला एसके सॉ मिल येथे भेटले.
तेव्हा त्याने आयशर सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. बंधपत्रावर गाडी सोडतो असे सांगितल्याने तक्रारदाराने कागदपत्रे दिली. त्यावर कुमावतने आमचे आर.एफ.ओ तांबे साहेबांकडे कागदपत्रे सादर करून तुझी गाडी सोडतो, असे म्हटले. मात्र आयशर सोडले नाही. त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा बुधवारी कुमावतची सॉ मिल येथे भेट घेतली. तेव्हा त्याने कन्नडला जात असून, सायंकाळी परत आल्यावर गाडी सोडतो, असे म्हटले. तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यात वनपरिक्षेत्र कार्यालयात कुमावत याने ४० हजारांवर तडजोड करून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी पथकाने एसके सॉ मिल येथे सापळा लावला.
तक्रारदार पैसे घेऊन गेले, मात्र कुमावतने उद्या पंचनामा करून गाडी सोडतो, असे म्हणत निघून गेला. मात्र सॉ मिलचा मालक इमरोज याने पैसे मॅनेजर गुड्डूकडे देण्यास सांगितले. आहेर चहाच्या टपरीजवळ गुड्डूने पैसे घेताच पथकाने पकडले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वनपाल कुमावत हा परजिल्ह्यातून येणारी लाकडाने भरलेली वाहने पकडल्यानंतर नियमानुसार ते शासकीय कार्यालयात घेऊन जाणे अपेक्षित असते, मात्र कुमावत एसके सॉ मिल येथे नेऊन उभी करायचा. त्यानंतर पैशाची मागणी केली जायची, असे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.