

Food items worth Rs 20 lakh seized in raids at four locations
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खाद्यपदार्थांमधील भेसळरोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. याअंतर्गत शनिवारी जुना मोंढा, नवीन मोंढा जाधववाडी, चिकलठाणा आणि पंढरपूर या चार ठिकाणी अचानक टाकलेल्या धाडीत संशयास्पद खाद्यतेल, धने पावडर, मिरची पावडर आणि खोबरे पावडरचा एकूण ७ हजार ७७७ किलो आणि तब्बल २० लाख ६८ हजार ६६९ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. यातील तीन आस्थापनांचे अन्न परवानेही निलंबित करण्यात आले.
एफडीए पथकाने चिकलठाणा एमआयडीसीतील मे. एल. एम. स्पायसेस या मसाला निर्मिती युनिटवर कारवाई करून 'अंबाड मसाले' बँडची १४३ किलो धने पावडर आणि १०३ किलो मिरची पावडर असा एकूण २४६ किलो साठा जप्त केला. या साठ्याची किंमत ९८ हजार ४०० रुपये आहे. उत्पादन भेसळयुक्त किंवा चुकीचे लेबल असलेले असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत जाधववाडीतील नवीन मोंढा परिसरातील बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला या प्रतिष्ठानातून एक लाख २९ हजार ३०० रुपये किंमतीची 'शिखर' ब्रँडची ४३१ किलो डेसिकेटेड कोकोनट पावडर जप्त करण्यात आली. या उत्पादनाबाबतही भेसळ आणि लेबलिंग नियमांच्या उल्लंघनाचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रतिष्ठानाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या उत्पादनांच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सहआयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त डी.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर, फरीद सिद्दिकी, प्रशांत अजिंठेकर, प्रा. पी. पी. सुरसे आणि व्ही. टी. रोडे यांच्या पथकांनी केली.