

Fire breaks out in pipe of new water supply scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहागंज येथील जुन्या बसस्थानकात ठेवण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिक पाईपांना आग लागल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एसटी महामंडळाचे शहागंज येथे जुने बसस्थानक असून, ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडिक आहे. त्यामुळे परिसरात कचरा व गवत वाढलेले असून, याच ठिकाणी कंत्राटदाराकडून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी वापरातील ३५-४० प्लास्टिक पाईप साठवण्यात आले होते. या पाईपांना सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीने धुराचे प्रचंड लोट उठले. या घनदाट काळ्या धुरामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे धुराचे लोट शहरातील दूरदूरच्या भागातून स्पष्ट दिसत असल्याने मोठी आग लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.
ही माहिती मिळताच ड्यूटी अधिकारी दीपराज गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवान दिनेश मुंगसे, प्रणाल सूर्यवंशी, त्रिंबक सावंत, मनसुपराव सपकाळ व वाहनचालक जगदीश गायकवाड यांनी मिळून अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लास्टिक जळाल्याने धुराचे प्रमाण मोठे दिसल्यामुळे आग भीषण असल्याची भावना निर्माण झाली होती, असे गंगावणे यांनी सांगितले.