

Chainsnatching and housebreaking For free brother from jail
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या भावाला जामिनावर बाहेर काढण्यासाठी पैशाची गरज असल्याने सराईत गुन्हेगाराने थेट चेनस्नॅचिंग आणि घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सराईत चार आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
कृष्णा माणिकराव सोळंके (२६, रा. गजानननगर), शुभम मदन राठोड (२४, रा. गारखेडा परिसर), मयूर वीरेंद्रसिंह दोटियाल (२१, रा. पुंडलिकनगर) आणि अमन महेबूब शेख (२१, रा. भारतनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सोमवारी (दि. १७) दिली.
अधिक माहितीनुसार, गारखेडा परिसरातील मोहटादेवी मंदिराजवळून सुमन वसंतराव निकम या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हिसकावून पळ काढला होता. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात आरोपी कृष्णा सोळंके, शुभम राठोड आणि मयूर दोटीयाल निष्पन्न झाले.
तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याचे १२ मणी, कानातील कुडके मोबाईल जप्त केला. तसेच फिर्यादी रामदास भानुदास वाघ यांच्या घरात घुसून मोबाईल, सोन्याचे झुंबर, मणी असा ऐवज २३ ऑक्टोबरला लंपास केला होता. या प्रकरणात आरोपी अमन शेखला ताब्यात घेतले. त्याने कृष्णा साळुंकेसोबत मिळून चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींकडून १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक अर्जुन राऊत, रेशीम कोळेकर, जमादार केवारे, अंमलदार संदीप बिडकर, अजय कांबळे, कल्याण निकम व अंकुश वाघ यांच्या पथकाने केली.
दोघे भाऊ सराईत गुन्हेगार
प्रमुख आरोपी कृष्णा सोळंके हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचा भाऊ गजानन याच्यावर एमआयडीसी सिडको ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. त्याला जामिनावर सोडविण्यासाठी कृष्णाने साथीदाराच्या मदतीने २३ तारख-`ला घरफोडी, तर ३१ ऑक्टोबरला चेनस्नॅचिंग केली. पैसे जमवून त्याने भावाचा जामीन करून घेतला.
१ नोव्हेंबरला त्याचा भाऊ जेलमधून बाहेर आला. दरम्यान, कृष्णा आणि त्याचा भाऊ गजानन दोघांना फेब्रुवारी महिन्यात पुंडलिकनगर पोलिसांनीच महिलेच्या पोटात लाथ मारून मंगळसूत्र हिसकावल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटले होते.