वादातून शेतकऱ्याचा खून; बाप-लेकाला जन्मठेप; जिल्हा, सत्र न्यायालयाचा निकाल

या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता
Murder news
Murder news
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील चौधरी गावणी येथे जुन्या वादातून शेतातून घरी परतणाऱ्या दाम्पत्याला रस्त्यात अडवून शेतकऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी बाप-लेकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी शनिवारी (दि. १८) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.ज्ञानेश्वर रामदास चौधरी (५०) आणि हेमंत ज्ञानेश्वर चौधरी (२१, दोघे रा. चौधरी गावणी, ता. सोयगाव) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मनिषा सुनील चौधरी (३४) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, १७ जुलै २०२१ रोजी सायंकाळी मनिषा आणि त्यांचे पती सुनील चौधरी हे शेतातील काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्यांचा मुलगा कार्तिक सायकलवरून मागून येत होता. लिहातांडा ते सोयगाव रस्त्यावर आरोपी ज्ञानेश्वर चौधरी व त्याचा मुलगा हेमंत यांनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ करत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

ज्ञानेश्वर चौधरी याने हातातील कोयत्याने सुनील चौधरी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या सुनील यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर हेमंतने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. पतीला वाचवण्यासाठी मनिषा पुढे आल्या असता, तुम्ही जास्त माजले, तुम्हाला मस्ती आली, आता जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत आरोपी ज्ञानेश्वरने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. यात त्यांच्या हातावर व पाठीवर गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या सुनील यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने शासकीय रुग्णालयात व नंतर प्रकृती खालावल्याने जळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साक्षीदारांचे जबाब ठरले निर्णायक

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील (लोकाभियोक्ता) बाळासाहेब महेर यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि प्रत्यक्षदर्शी फिर्यादी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ आणि ३४ अन्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा आरोपींनी एकत्र भोगायच्या आहेत. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार नितीन जाधव यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news