

Farmers' Jalasadhi movement at Ammalner
गंगापूर : जायकवाडी धरणातील फुगवटा क्षेत्राचे पाणी अंमळनेर, लखमापूर आणि गळनिंब (ता. गंगापूर) या गावांतील शेतकऱ्यांच्या असंपादित ७/१२ उताऱ्यावर असलेल्या शेती पिकांमध्ये दरवर्षी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसान भरपाई व शेतजमिनीचे भूसंपादन करून संयुक्त मोजणीसाठी नकाशा तयार करण्यात यावा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ४) अंमळनेर वस्ती येथील शेतात सामूहिक जलसमाधी आंदोलन छेडले.
सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह अनेक शेतकरी कुटुंबियांनी पाण्यात उतरून घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला. आंदोलन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, १९९८ सालापासून जायकवाडी धरण भरले की, धरणातील गाळ वाढल्याने फुगवटा क्षेत्रातील पाणी थेट त्यांच्या शेतात शिरते. परिणामी, पिके वारंवार पाण्यात जातात आणि त्यांचा संपूर्ण शेती खर्च वाया जातो.
या आंदोलनात इसाभाई पठाण, राधेश्याम कोल्हे, बालचंद पंडित, शिवाजी दरगुडे, समद पठाण, शाईन पठाण, कडू बाबा पठाण, संतोष टेकाळे, विक्रम पंडित, जनार्धन मिसाळ, मुनीर पठाण, किरण साळवे, लवकुश कर्जुले, बाबासाहेब भरपुरे, हरीचंद्र पंडित, कोंडीराम पंडित, लिलाबाई मिसाळ, खंडू भरपुरे, रामकृष्ण दरगुडे, सविता मिसाळ, अल्काबाई नरवडे, मंदाबाई दरगुडे, मीना कोल्हे, गयाबाई कोल्हे, साहेरा पठाण, शमीना पठाण, राजूभाई पठाण, पायल पंडित आदी उपस्थित होते.
तातडीने मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात शुल्क भरल्याची माहिती देत, चार महिन्यांत नुकसानभरपाईचा निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आल्यानंतर तब्बल सात तास चाललेले जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, शाखा अभियंता नेहा धुळे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, भूमी अभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहायक आप्पासाहेब टॉपे, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुणे, मंडळ अधिकारी मीना सूक्ते, तलाठी पल्लवी लोणे, पोलिस पाटील संदीप चित्ते, पो. काँ भागवत खाडे, पो. कॉ. संदीप राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.