

छत्रपती संभाजीनगर : फर्जन बाबा यांच्या मृत्यूनंतर ज्या खोलीत साडेपाच कोटींची रोकड आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला, त्या खोलीची चावी सुरेश वर्मा यांच्याकडे होती. पोलिसांनी शीलाबाईला अटक करून तपास सुरू केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
दरम्यान, या प्रकरणी 'पुढारी'ने वृत्त प्रकाशित करताच सोमवारी (दि.१३) छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वर्मासह फर्जन यांच्या अन्य सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. यासोबतच आरोपी शीलाबाई आणि फर्जन यांच्या मुलांनाही जप्त करण्यात आलेली रोकड आणि शस्त्रास्त्रांबाबत समोरासमोर बसवून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फर्जन बाबा यांची मिटमिटा भागात सुमारे १७ एकर शेती आहे. ही शेती त्यांचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र वर्मा सांभाळत आहे. मृत्यूपूर्वी बाबांनी त्याच्याकडेच कोट्यवधींची रोकड आणि शस्त्रास्त्रे ठेवलेल्या बंगल्यातील खोलीची चावी सोपवली होती. मात्र आपण त्या खोलीत कधी गेलोच नसल्याचा जबाब वर्मा यांनी छावणी पोलिसांना दिला आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर हे सोमवारी छावणी पोलिस ठाण्यातच तळ ठोकून होते. दुसरीकडे, अटकेतील शीलाबाई आणि फर्जन यांच्या मुलाला सोबत घेऊन छावणी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम यांचे पथक फर्जन यांच्या रोहिला गल्लीतील जुन्या घरी तपासासाठी गेले होते. तेथील जुन्या बर्फ कारखान्यातही पोलिसांकडून कसून झाडाझडती घेण्यात आली.
मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नाही. खोलीमध्ये काही देवतांचे फोटो आणि पलंगावर एक जुनी सुटकेस आढळून आली. वर्षभरापासून हे घर बंद होते, मात्र साफसफाईवरून मध्यंतरी कोणीतरी येथे येऊन गेले असावे, अशी शक्यता फर्जन यांच्या मुलाने बोलून दाखवली.
आयकर विभागाला दिले पत्र
साडेपाच कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केल्यानंतर छावणी पोलिसांनी सोमवारी (दि. १३) आयकर विभागाला पत्राद्वारे या पैशाचा स्रोत तपासण्यासाठी कळवले आहे. या साडेपाच कोटींचा आयकर भरणा फर्जन यांनी केला होता का, हे आयकर विभाग तपासू शकते. या पैशावर कोणी अधिकार सांगितला आणि करचुकवेगिरी करून रोकड दडवल्याचे समोर आले, तर त्याचा दंड संबंधित दावा करणाऱ्याला भरावा लागू शकतो, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र तत्पूर्वी हा पैसा कोणत्या मार्गाने कमवला, हे सिद्ध करावे लागणार आहे.
सीसीटीव्ही फुटेजवर पोलिसांची चुप्पी
बाबा फर्जन यांच्या खोलीत साडेपाच कोटी आणि शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्या खोलीसह बंगल्याला असलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. मात्र त्या फुटेजमध्ये फर्जन यांच्या मृत्यूनंतर महिनाभरात ती खोली उघडून आत कोणी गेले होते का आणि किती ऐवज बाहेर गेला, याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. यामुळे संशय निर्माण होत आहे.
बंगल्याच्या डागडुजीला जुन्या सहकाऱ्यांकडून पैसे
बाबा फर्जन यांनी स्वतःकडील कोट्यवधींची माया कोणालाही कळू नये, याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी उपचारासाठी थेट जर्मनी येथून जवळच्या एका व्यक्त्तीकडून पैसे मागवले होते. तर मध्यंतरी घराची डागडुजी करण्यासाठी कामगार संघटनेच्या काही जुन्या सहकाऱ्यांना ५० हजारांचा खर्च करायला लावला. घरातून पैसे काढून देण्यास बाबा नेहमीच टाळाटाळ करत असत, असेही सूत्रांनी सांगितले.
आज शीलाबाईला न्यायालयात हजर करणार
चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मंगळवारी (दि.१४) अटकेतील आरोपी शीलाबाईला पोलिस पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. तर दुसरीकडे तिच्या बहिणी आणि फर्जन यांच्या भावाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.