

Execute the Satara-Deolai drainage line work only after coordinating with the farmers!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सातारा-देवळाई परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेजलाईन प्रकल्पाच्या कामांना गती देताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील कामकाज करावे, असे निर्देश शुक्रवारी (दि.२९) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. डीपी रस्त्यांचे अचूक सर्वेक्षण व मार्किंग न झाल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून कामाला विरोध होत असल्याचे पाहणीत समोर आले.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी कांचनवाडी येथील एसटीपी प्रकल्प, डीपी रस्ते, रोबोटच्या सहाय्याने सुरू अस लेली ड्रेनेजलाइन दुरुस्ती व सातारा-देवळाई परिसरातील रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिल तनपुरे, संबंधित एजन्सी आणि पीएमसीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कांचनवाडी येथील १६१ एमएलडी क्षमतेच्या मलजल निस्सारण प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. एसटीपीमधून बाहेर पडणाऱ्या शुद्ध पाण्याची प्रक्रियाही त्यांनी समजून घेतली. त्यानंतर नाथव्हॅली परिसरातील डीपी रस्त्यांची पाहणी करण्यात आली. दरम्यान, रोबोटच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या ड्रेनेजलाईन दुरुस्तीच्या कामाचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.
पारंपरिक पद्धतीपेक्षा रोबोट तंत्रज्ञानामुळे काम अधिक जलद आणि अचूक होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच सातारा-देवळाई परिसरात काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याचे समोर आले. संबंधित ठिकाणी डीपी रस्ते प्रस्तावित असले तरी त्यांचे प्रत्यक्ष मार्किंग न झाल्यामुळे लाईन कुठून टाकायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर आयुक्तांनी टोटल स्टेशन सर्वेक्षण करून डीपी रस्त्यांचे अचूक मार्किंग करावे आणि त्यानंतर शेतकऱ्यांशी समन्वय साधूनच काम पुढे न्यावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले.