

Except for tomatoes and potatoes, all vegetables have become more expensive by more than Rs 100.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे झालेले नुकसान आणि थंडीमुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव चांगलेच वधारले आहेत. कांदे-बटाटे आणि टोमॅटो सोडले तर इतर सर्वच फळभाज्यांनी प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. शेवगा २४० रुपये किलो आणि गवार दोनशे रुपयांपर्यंत महागल्याने गृहणींचे रोजचे बजेट कोलमडले आहे.
अतिवृष्टीनंतर परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक कमी झाली आहे. यामुळे दोन आठवड्यापासून भाजीपाला महागला आहे. शहरातील केळीबाजार, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, शिवाजीनगर येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्या सारखे चित्र आहे.
वांगी, भेंडी, फ्लॉवर, कारले, दोडके यासर्वच फळभाज्या ३० रुपये पाव आणि शंभर रुपये किलोवर गेल्या आहेत. चांगले टोमॅटो सरासरी ५० रुपये किलो, कोबी ६० ते ७० रुपये किलो, बटाटे ३० ते ४० आणि कांदे २० ते ३० रुपये असे दर वाढले आहेत. पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मेथीची जुडी १५ रुपये, तर पालक, शेपू आणि करडईची जुडी १० रुपऱ्यांना मिळत आहे. कोथिंबीरची जुडी ३० रुपयांवरून २० रुपयांवर आली आहे.
भाजीपाल्याच्या भावात तेजी
पावसामुळे झालेले नुकसान आणि आता थंडीमुळे भाजीमालाची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव तेजीत आहेत. शेवगा १२० वरून २४० रुपये किलो, तर चांगली गवार २०० रुपये किलोने विक्री होत आहे. वांगी, फ्लॉवर, दोडके, कारले आणि कोबीचे भावही ४० टक्क्यांनी वाढले आहेत. पालेभाज्या काहीश्या स्वस्त झाल्या आहेत.