

Even before the alliance is formed, a secret panel of prospective candidates is ready.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
: महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावर बोजणी सुरू आहे, तर दुसरीकडे याच पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांनी आपापल्या प्रभागांमध्ये इतर पक्षांच्या उमेदवारांसोबत गुप्त पॅनल तयार करीत प्रचार सुरू केला आहे. यात कोणी विरोधी पक्षासोबत, तर कोणी वॉर्डात प्राबल्य असलेल्या अपक्षासोबत मैत्री केली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शेवटचे दोन दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. त्यात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी झाली नसल्याने दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांच्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
त्यात यंदा उमेदवारी अर्ज अतिशय किचकट स्वरूपाचा असल्याने जवळपास सर्वच इच्छुकांनी अर्ज घेऊन तो भरण्यासोबतच त्याची तज्ज्ञांकडून तपासणीही करून घेतली आहे. अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ आहे. त्यामुळेच अनेकांनी सोमवारी अर्ज दाखल करण्यावर भर दिला आहे. यात काहींनी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा न करता आपापले उमेदवारी अर्ज तयार करून ठेवले आहेत. काहींनी उमेदवारी दाखल करण्यासाठी मुहूर्तही बघून ठेवला आहे. यातील बहुतांश इच्छुक आज अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.
स्वपक्षाऐवजी विरोधकासोबत पॅनल
यंदा महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीत होत आहे. यात चार वॉर्डाचा एक प्रभाग असून, निवडून येण्यासाठी एकाला किमान १२ हजारांवर मते लागतील. त्यामुळे किमान एका-एका उमेदवाराला ५० लाख ते १ कोटी रुपयांहून अधिक खर्च येईल, अशी चर्चा आहे. त्यासाठी अनेकांनी प्रभागात आर्थिकदृष्ट्या दमदार असलेल्यांशीच पॅनल तयार करण्यावर भर दिला आहे. मग तो उमेदवार स्वः पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा.