

ESI's ICU will be operational in two months: Director
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ईएसआयसी हॉस्पिटलमधील आयसीयू अनेक महिन्यांपासून धूळखात पडले आहे. यामुळे कामगार, रुग्णांची गैरसोय होत असल्याने आयसीयूसेवा दोन महिन्यांत कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन राकावि सोसायटी संचालक (वैद्यकीय) डॉ. शशी कोळनूरकर यांनी दिले. तसेच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी नियमित वेळ-`वर हजर राहण्याच्या सूचनाही केल्या.
चिकलठाणा येथील ईएसआयसी हॉस्पिटलला शनिवारी (दि.१९) भेट देत त्यांनी पाहणी केली. तसेच रुग्णसेवेचा आढावाही घेतला. राज्य कामगार विमा रुग्णालयामध्ये १० खाटांचे अद्यायवत आयसीयू वॉर्ड केले आहे. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून हे आयसीयू धूळखात पडले आहे. तसेच नवीन एक्स-रे मशीनही सीआर सिस्टमअभावी बंदच आहे. या सेवा रुग्णांसाठी आवश्यक असल्याने त्या त्वरित कार्यान्वित कराव्यात या मागणीसाठी बुलंद छावाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, शनिवारी राज्य कामगार विमा सोसायटी मुंबई महाराष्ट्राचे वैद्यकीय संचालक डॉ. कोळनूरकर हे हॉस्पिटलमध्ये आले असता त्यांची भेट घेतली. त्यांनी आयसीयू, एक्सरे सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, शहराध्यक्ष बाबासाहेब चौधरी, संदीप जाधव, योगेश देशमुख, रेखाताई वहाटुळे, तालुकाध्यक्ष शिवाजी पळसकर यांची उपस्थिती होती.
कामगार, त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, म्हणून वेतनातून पैसे कपात केले जाते. मात्र, डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना सेवा दिली जात नाही. शनिवारीही वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन फडणीस आणि आरएमओ पालोदे यांनी उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोप करत बुलंद छावाचे बुलंद सचिव सुरेश वाकडे यांच्यासह सहकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
संचालक रुग्णसेवेचा आढावा घेत असतानाच उपचारासाठी दाखल वयोवृद्ध महिला आपल्या हातानेच पायावर मलम लावत होती. हे बघून संचालकांचा पारा चढला. त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना याबाबत विचारणा केली. तसेच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी वेळेनुसार हजर राहून रुग्णांना योग्य सेवा देण्याची तंबीही दिली.