

Employee Stuck in Collector's Office Elevator
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्ट बुधवारी (दि.२०) सकाळी अचानक बंद पडली. त्यामुळे एक कर्मचारी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे आत अडकला. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्याला सुरक्षित बाहेर काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत डावीकडे मोठी लिफ्ट आहे. तिचा वापर कर्मचारी आणि नागरिकही करतात. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एक कर्मचारी तळमजल्या येण्यासाठी लिफ्टमध्ये बसला. परंतु लिफ्ट अर्ध्यात आल्यानंतर अचानक बंद पडली. काचांमुळे लिफ्ट पारदर्शक असल्याने लगेचच ही बाब इतरांच्या लक्षात आली. त्यानंतर एकच धावपळ उडाली.
तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मास्टर की च्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजात उघडून संबंधित कर्मचार्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. तोपर्यंत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा कर्मचारी लिफ्टमध्ये अडकला होता. काही वेळाने ही लिफ्ट पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.