

छत्रपती संभाजीनगर : एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या परस्पर पैसे वाटप करण्यासाठी घेऊन आल्याच्या संशयावरून नारेगावमध्ये दोन गटांत बुधवारी (दि.१४) रात्री तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूंच्या सुमारे १०० लोकांच्या जमावाने एकमेकांवर दगड, लाठी-काठ्यांनी हल्ला चढवला. या हाणामारीत ८ जण जखमी झाले असून, दोघांची डोकी फुटली आहेत.
पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करून जमाव पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. काही वेळातच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी रूटमार्च काढला.
दरम्यान मतीन आणि अस्लम या दोघांच्या गटात हा राडा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. अधिक माहितीनुसार, एका उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाची जबाबदारी सोपवली होती. यातील एक कार्यकर्ता नुकताच पक्ष बदल करून पुन्हा स्वगृही परतला होता. त्याने उमेदवाराच्या परस्पर पैसे वाटपासाठी आणल्याची कुणकुण लागताच बुधवारी सकाळीच त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती. मात्र त्यावेळी आपसांत समजोता झाला. हाच वाद रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास पुन्हा उफाळून आला.
एकाच पक्षातील दोन गट आमनेसामने आल्याने आणि त्यात पैसे वाटपाची चर्चा असल्याने नागरिकही मोठ्या संख्येने जमले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून एमआयडीसी सिडको पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बळाचा वापर केला. दरम्यान, घाटीतील अपघात विभागात विचारणा केली असता, इरफान, रईस, नदीम, इद्रीस आदींसह आठ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस आयुक्तांची घटनास्थळी पाहणी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी रात्री उशिरा स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी मनोज पगारे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, गजानन कल्याणकर, अतुल येरमे, मोहसीन सय्यद, रविकांत गच्चे यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. दंगा काबू पथकही तेथे तैनात करण्यात आले