

छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस शुक्रवारी, 8 सप्टेंबर 2025 रोजी असून शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी आहे. त्यामुळे 8 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असून ‘ईद -ए-मिलादुन नबी’ निमित्त राज्य सरकारनेे शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विविध मुस्लीम संघटनांची गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिनी काढण्यात येणारा जुलूस 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. ‘मोहम्मद पैगंबर’ यांच्या जन्मदिनी जुलूस काढण्याची परंपरा आहे.
मुस्लीम समुदाय या पवित्र दिवशी जुलूस काढून ‘ईद -ए-मिलादुन नबी’ साजरी करतो. परंतु यंदा गणेश विसर्जनानंतर जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 8 सप्टेंबर रोजी ‘ईद -ए-मिलादुन नबी’ या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे, असे आमदार रईस शेख म्हणाले.