

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होऊन सुमारे दीड महिना उलटला असताना तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. काही शाळांना केवळ अर्धवट पुस्तके मिळाली असून अनेक शाळांना अजिबातच पुस्तके प्राप्त झालेली नाहीत. या संदर्भात अनेक पालक आणि शिक्षकांनी तक्रारी नोंदवल्या असून, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणातच पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत. यासंदर्भात हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शेख अब्दुल रहीम यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, राज्यातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शंभर टक्के मोफत पाठ्यपुस्तकांची पूर्तता करावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात पाठ्यपुस्तकांची छपाई मागणीपेक्षा अधिक प्रमाणात झाल्याची माहिती समग्र शिक्षा परिषद मुंबईच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. यास अनुसरून प्रकल्प संचालकांनी सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना तातडीने पाठ्यपुस्तकांचे समायोजन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कार्यवाही झालेली नाही असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात कृत्रिम तुटवड्यामुळे अनेक विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तकांपासून वंचित का राहिले? या प्रश्नांची गंभीर चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा विद्यार्थी हितासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या मुंबई कार्यालयासमोर लोकशाही मार्गान धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेख अब्दुल रहीम यांनी दिला आहे. हे निवेदन राज्याचे प्रकल्प संचालक संजय यादव यांना ईमेल आणि व्हॉट्सपद्वारे सादर करण्यात आले असून, त्याची प्रत प्राथमिक शिक्षण संचालक पुणे, शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) छत्रपती संभाजीनगर व जालना यांनाही पाठवण्यात आली आहे
तालुक्यातील जिल्हा परिषदत शाळेत गोर गरिब कष्टकरी, कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शंभर टक्के मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहे. मात्र, समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी दीड महिन्यापासून पुस्तकापासून वंचित आहेत. यामळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.