

Due to the bank employees' strike, transactions worth 600 crore rupees have come to a standstill
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शहरातील बँक कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारत मंगळवारी (दि. २७) अदालत रोड, पंजाब नॅशनल बँक शाखा येथे जोरदार निदर्शने केली. या संपात सहभागी बँकिंग कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, संपामुळे दिवसभरात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियनस (यूएफबीयू) च्या नेतृत्वात विविध बँकिंग संघटनांच्या वतीने देशभरातील बँकिंग क्षेत्रासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, या मागणीसाठी मंगळवारी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. तसेच या मागणीसाठी अदालत रोड येथे निदर्शने करण्यात आली. यात विविध बँकांचे ५०० ते ६०० कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या संपामुळे बँकांमधील क्लिअरिंगचे सुमारे ६०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याने बँकिंग ग्राहकांची गैरसोय झाली.
निदर्शनाच्या सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एनसीबीचे ललित निकुंभ म्हणाले, अपुरे मनुष्यबळ आणि कामाचा ताण यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी शारीरिक व मानसिक तणावाखाली आहेत. सुमारे ८२ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांना वर्क-लाईफ बॅलन्स नसल्यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंब व स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे असताना पाच दिवसांच्या आठवड्यासाठी आंदोलन करावे लागते, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन राजेंद्र देवळे यांनी, तर प्रणव कौशिके यांनी आभार व्यक्त केले.
काय म्हणाले बँकिंग संघटनांचे पदाधिकारी - आयबॉकचे कॉ. सतीश घुगे यांनी परदेशात चार दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चा सुरू असताना भारतात पाच दिवसांच्या आठवड्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
- नोबोचे बँक ऑफ महाराष्ट्रचे अजय बोरसे व बँक ऑफ बडोदा चे रवींद्र सुतवणे यांनी पाच दिवसांचा आठवडा आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले.
एसबीआयचे कॉ. राहुल साळुंखे, एमजीबीच्या कॉ. राजश्री वरूडकर, एनसीबीच्या एसबीआयच्या स्वाती चव्हाण तसेच एआयबीओएचे कॉ. नीलेश खरात यांनी घोषणाबाजी करत सभेला पाठिंबा दिला.
..तर बेमुदत संपाचा निर्णय
प्रमुख मार्गदर्शन करताना कॉ. देविदास तुळजापूरकर म्हणाले, हा लढा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी असून, मागून दिले नाही तर हिसकावून घेण्याची ताकद बँक कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या आंदोलनातही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत अन्यथा पुढील टप्प्यात बेमुदत संपाचा उच्च स्तरावर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कर्मचारी पूर्ण ताकदीने करतील, असेही ते म्हणाले.